लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू मेडिकल व मेयोमध्ये झाले आहेत. केवळ एक मृत्यू मनोरुग्णालयात झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.शासनाने गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने मानसिक आरोग्यविषयक धोरण प्रभाविपणे राबविण्यासाठी मानसिक आरोग्य प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. यात अभ्यागत समितीच्या कार्यकक्षा वाढविण्यात आल्या. त्यानुसार मानसिक आरोग्य कायदा १९८७ अनुच्छेद पाचमधील भाग क्र १ नुसार कलम ३७, ३८ व ३९ प्रमाणे या समितीने मनोरुग्णालयाचे कामकाज पाहणे सुरू केले आहे. सोबतच समितीच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत मानसिक शुश्रृषागृहांचा परवाना व नूतनीकरणाकरिता गठित केलेल्या समितीचा अहवाल तपासून राज्यस्तरावर शिफारस करणे, दर महिन्याला अभ्यागत समिती सदस्यांच्या बैठकीत मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांना ‘डिसचार्ज’ व प्रमाणपत्र देणे, प्रादेशिक मनोरुग्णालयातील आंतररुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ आॅडिट’ करून अहवाल सादर करणे व मनोरुग्णालयाच्या तपासणीकरिता नियमित भेटी देणे आदी जबाबदाऱ्या या समितीवर टाकण्यात आल्या. परंतु त्यानंतरही रुग्णालयातील रुग्णांचे मृत्यू थांबलेले नाहीत. एप्रिल ते आतापर्यंत १८ मनोरुग्णांचे मृत्यू झाले आहे. यातील बहुसंख्य मृत्यू आजारपणामुळे झाले आहेत.
औषधांचा तुटवडाप्राप्त माहितीनुसार, औषध पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबईच्या हाफकिन कंपनीला देण्यात आली आहे, तेव्हापासून रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान याविषयी चर्चा होऊ नये म्हणून शासनाने काही निधी दिला होता. या निधीतून मोठ्या संख्येत औषधे खरेदी करण्यात आली. परंतु त्यानंतर निधी न मिळाल्याने रुग्णालयात अनेक महत्त्वाची औषधे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.
वेळीच औषधोपचाराकडे दुर्लक्षमनोरुग्णालयातील रुग्णांची तपासणीसाठी मेडिकलच्या तीन डॉक्टरांची चमू एकदिवसाआड आपली सेवा देते. परंतु चमूकडून योग्य पद्धतीने तपासणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सोबतच रुग्णालयातील काही डॉक्टर याला गंभीरतेने घेत नसल्याने किंवा तक्रारी येईपर्यंत रुग्णाला पाहत नसल्याने वेळीच औषधोपचार मिळत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, रुग्ण गंभीर होऊन मेयो, मेडिकलला पाठविला जातो. परंतु येथे गाठतो तो मृत्यूच.