लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात हवा प्रदूषणाने दरवर्षी जवळपास ७० लाख लोक मरण पावतात. लॅन्सेट हेल्थ जर्नलच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातही दरवर्षी १.८० लाख लाेक प्रदूषित हवेचे बळी ठरत आहेत. विशेष म्हणजे हवेची गुणवत्ता गाठू न शकणाऱ्या शहरांमध्ये सर्वाधिक १९ शहरे राज्यातील आहेत. वायुप्रदूषणामुळे २०१७ ते २०१९ दरम्यान झालेल्या एक लाख मृत्यूंसह उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. त्यामुळे काेराेनानंतर येत्या काळात वायुप्रदूषण हे महामारीचे रूप धारण करेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
वातावरण फाऊंडेशनच्यावतीने जागतिक आराेग्य दिनाचे औचित्य साधून ‘हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ या विषयावर बुधवारी ऑनलाइन चर्चासत्राचे आयाेजन करण्यात आले. यामध्ये नागपूरचे श्वसनराेग तज्ज्ञ डाॅ. समीर अर्बट, पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्र, मुंबईच्या डाॅ. अमिता आठवले, बालराेगतज्ज्ञ डॉ. अदिती शहा, पुण्याचे डॉ. संदीप साळवी प्रामुख्याने उपस्थित हाेते. डॉ. समीर अर्बट म्हणाले, हवा प्रदूषण हे फुप्फुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. हवा प्रदूषण आणि कोरोनाचे थेट संबंध स्पष्ट झाले नसले तरी येणाऱ्या काळात कोरोनानंतर सर्वात मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
डॉ. संदीप साळवी म्हणाले, केवळ औद्योगिक क्षेत्रातून, वाहनांतून हवा प्रदूषण होत आहे असे समजणे चूक ठरेल. आपणही या प्रदूषणात व्यक्तिगतरीत्या भर घालतो हे प्रत्येकाने मान्य करायला हवे. घरात आपण एक मच्छरची कॉईल जाळल्याने निघणारा धूर १०० सिगारेट्सच्या बराेबर असताे. चुलीवर बनणाऱ्या स्वयंपाकामधूनही धूर निघताे. सीओपीडी हे सर्वाधिक मृत्यू होण्यासाठी क्रमांक दोनचे कारण आहे आणि सीओपीडीचे कारण प्रदूषित हवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केेले. डॉ. अदिती शहा यांनी, प्रदूषित हवेमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येत असल्याचे सांगितले. गेल्या १० वर्षांत लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. अमिता आठवले यांनी लहान उद्याेग व घरातील प्रदूषणाकडेही गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यामुळे शुद्ध हवेसाठी आताच उपाययाेजना करण्याचे आवाहन सर्व तज्ज्ञांनी केले.