लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरामध्ये चौफेर विकास कार्य सुरू आहेत. केंद्रीय रस्ते निधीमधून (सी.आर.एफ) सुमारे १८०० कोटींचा निधी हा विकास कार्यासाठी दिला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी दिली. वर्धा रोड ते उमरेड रोडला जोडणाऱ्या वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून पालकमंत्री डॉ.नितीन राऊत उपस्थित होते. तर मुख्य कार्यक्रमास महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम रेल्वेच्या जागेमुळे बऱ्याच वर्षांपासून रखडले होते. रेल्वे मंत्रालयाशी या रस्त्याच्या निर्मितीकरिता असलेल्या सर्व अडचणी दूर केल्या आणि दक्षिण नागपुरातील जनतेला हा रस्ता उपलब्ध करून दिला आहे. सदर रस्त्याचे बांधकामामधले सिग्नल व्यवस्था तसेच चौकाचे डिझाईन महापालिकेने सुधारून अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना गडकरी यांनी मनपाला केली.
नागपूर ते उमरेड हा रस्तासुद्धा सक्करदरा चौकापर्यंत चार पदरी होणार असून, रुंदीकरणासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. येथील मल्टी मॉडेल स्टेशनसाठी सुमारे ८०० हेक्टर जागा लागणार असून, येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना कॉटर्स, शाळा या सुविधा आजच्यापेक्षा चांगल्या मिळतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली
...
३० मेट्रो धावणार
रिंगरोड ही शहराची हार्टलाइन आहे. ब्रॉडगेज मेट्रोने चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, छिंदवाडा, बैतुल, रामटेक अशी सर्व गावे जोडली जाणार आहेत. ३० मेट्रो आपण घेत आहोत. ३६ कोटी रुपयांची एक मेट्रो असून, ती घेण्यासाठी एमएसएमईतून कर्ज देण्यास तयार आहे. नागपूर व विदर्भातील तरुण उद्योजक तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
.....
कॅम्पस ते आरटीओ कार्यालय दरम्यान उड्डाणपूल
फुटाळा तलावातील फाऊंटेन शो यासाठी तसेच कॅम्पस ते आर.टी.ओ. कार्यालयपर्यंतच्या उड्डाणपूल हे काम सी.आर.एफ. मधून होत आहेत. महापालिकेद्वारे शहरात चौफेर विकासकार्य होत आहे, तसेच कस्तुरचंद पार्क ते रेल्वे स्टेशन हा एक उड्डाणपूल होणार आहे. आगामी काळात नागपूर बदललेले दिसेल, असेही ते म्हणाले.
....
१.५ कि.मी. अंतर कमी झाले.
आज लोकार्पण झालेला वंजारी नगर ते अजनी रेल्वे स्टेशन हा रस्ता ५२४ मी लांबीचा असून ३० मीटर रुंद आहे.४ पदरी रस्ता असून १.५ मी लांबीचे फुटपाथ आहेत. दोन्ही बाजूंना १.६० मीटर रुंदीचे सायकल ट्रॅकही देण्यात आले आहेत. या रस्त्यादरम्यान वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होणार असून, वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. या रस्त्याखाली ३० मीटर लांबीचे २ अंडरपास देण्यात आले आहेत. रस्त्याचे दोन्ही बाजूला २ मीटर उंचीचे ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात आले असून, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना रहदारीचा त्रास होणार नाही.
...