नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश नाकारणाऱ्या १८१ शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. २९१ शाळांना शिक्षण उपसंचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यातील केवळ ११० शाळांनी उत्तरे दिली आहेत. उर्वरित शाळांवर मान्यता रद्द करणे किंवा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत ‘आॅनलाईन’ सोडतीत क्रमांक लागलेल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी शाळा टाळाटाळ करीत होत्या. अनेक नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कोणी ‘एन्ट्री पॉईन्ट’चे कारण दाखविले तर अनेकांनी पालकांकडून विविध नावांखाली शुल्काची मागणी केली आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. शिक्षण उपसंचालकांनी ११ मे रोजी २९१ शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीशीला उत्तर देण्याची १३ मे ही अखेरची मुदत होती. यात केवळ १०६ शाळांनी उत्तर दिले आहेत. ज्या शाळांनी उत्तर दिलेले नाही त्यात शहरातील नामांकित शाळांचा समावेश आहे. या शाळांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. ‘सीबीएसई’च्या शाळांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ काढून घेण्यात येईल तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या आशयाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)३५ शाळा देणार नर्सरीपासून प्रवेशनोटिशीला दिलेल्या उत्तरानुसार ३९ शाळा या नर्सरी तसेच पहिली इयत्तेपासून प्रवेश देण्यास तयार झाल्या आहेत. ७१ शाळा या फक्त पहिलीपासूनच प्रवेश देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या शाळा प्रवेश देताना शुल्काची मागणी करतील त्यांची माहिती पुरविण्याचे आवाहन ‘आरटीई अॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी केले आहे.पालकांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेरावदरम्यान, ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत क्रमांक लागलेल्या पाल्यांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी बुधवारी दुपारी पालकांनी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना घेराव घातला. कोल्हे यांनी पालकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, काही पालकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अखेर तणाव शांत करण्यासाठी पोलिसांना बोलविण्यात आले.
१८१ शाळांवर कारवाईचा हातोडा
By admin | Published: May 14, 2015 2:35 AM