निशांत वानखेडे
नागपूर : युक्रेनमधील हालचालींकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्या युद्धग्रस्त स्थितीमध्ये अडकलेले आपले आप्तस्वकीय सुखरूप परतावेत म्हणून भारतीयांचीही आस त्याकडे लागली आहे. अशा स्थितीत युक्रेनमधून भारतीयांना काढण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली ‘ऑपरेशन गंगा’ माेहीम वरदान ठरली आहे. या माेहिमेचा भाग हाेणे ही अभिमानास्पद बाब असून या सेवेत सहभागी झालेल्या नागपूरकर वैमानिक अभिजित मानेकर यांच्या रूपाने शहरवासीयांनाही ही गर्व करण्याची संधी मिळाली आहे.
‘गाे फर्स्ट’ कंपनीच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन अभिजित यांनी शनिवारीच युक्रेनमधील १८३ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप दिल्लीला आणले. बुडापेस्टमध्ये थांबलेल्या या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ३ मार्चला दिल्लीहून त्यांचे विमान रवाना झाले हाेते. तेथील वैमानिकांच्या टीममध्ये अभिजित मानेकर यांचीही निवड झाली हाेती. दिल्ली-कुवैत-बुडापेस्ट हाेत त्याच मार्गाने विमान परतले. परतल्यानंतर विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांच्या डाेळ्यातील आनंदाश्रू पाहून मनात गर्व निर्माण झाल्याची भावना ‘लाेकमत’शी बाेलताना कॅप्टन अभिजित यांनी व्यक्त केली.
अभिजित अरविंद मानेकर हे शिवाजीनगर येथील रहिवासी. शालेय शिक्षण साेमलवार शाळा तर शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून बारावीमध्ये ते गुणवत्ता यादीत आले हाेते. वायसीसीईमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी नागपूर फ्लाईंग क्लबमधून वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. दाेन वर्षे त्यांनी याच संस्थेत ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणूनही सेवा दिली. २०१८ मध्ये त्यांची ‘कमर्शियल पायलट’ म्हणून ‘गाे एअर’ विमानसेवेत नियुक्ती झाली.
आता कळली वायुसैनिकांची अभिमानास्पद भावना
कॅप्टन अभिजित म्हणाले, तीन वर्षे नाेकरी केल्यानंतर मिळालेली ही देशसेवेची संधी अतुलनीय अशी आहे. सामान्यपणे प्रवाशांची ने-आण करणे वैमानिकांसाठी जबाबदारीचेच काम असते पण हा अनुभव जाेखीम आणि जबाबदारी दाेन्हीचा हाेता. म्हणूनच ताे राेमांचकही हाेता. पायलट हाेण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. देशसेवेची संधी मिळणे हा खराेखर अलाैकिक अनुभव असताे. आता कळले, सैनिक व वायुसैनिकांना गर्व का हाेताे ते, अशी भावना कॅप्टन अभिजित यांनी व्यक्त केली.