बाबा टेकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सावनेर तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींमध्ये विविध कामे केली जात आहे. त्यामुळे १,८३६ मजुरांच्या हाताला काम आणि त्यांच्या १,२४२ कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. या सर्व कामांवर एकूण ६० लाख ८९ हजार रुपये खर्च केले जात आहे.
सावनेर तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींची त्यांच्या कार्यक्षेत्रात मनरेगाची कामे सुरू आहेत. या सर्व कामांवर ६० लाख ८९ हजार रुपये खर्च केले जाणार असून, यात सर्वाधिक ३ लाख ४८ हजार रुपयांची कामे बडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत तर सर्वात कमी म्हणजेच एक हजार रुपयांची कामे दहेगाव ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आली.
मनरेगा अंतर्गत अहल्यादेवी सिंचन विहीर, अमृत कुंड शेततळे, भू संजीवनी वर्मी कंपोस्टिंग, भू संजीवनी नाडेम कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल स्वच्छालय, निर्मल शोष खड्डा, समृद्ध अंकुर रोपवाटिका, गाव तलाव, इतर जलसंधारणाची कामे, नंदनवन वृक्षलागवड व संगोपन यासह समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत क्रीडांगणे, अंगणवाडी इमारत बांधकाम, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, घरकुल बांधकाम, गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, गुरांचा गोठा, कुक्कटपालन शेड, शेळीपालन शेड, मत्स्यव्यवसायाच्या ओट्यांचीही कामे केली जात आहेत.
वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७० च्या ६ ऑगस्ट २०१४ पर्यंत सुधारित अनुसूची २ मधील परिच्छेद ४ मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे वैयक्तिक लाभाची कामे देताना प्रवर्गातील कुटुंबांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, निरधी सूचित जमाती (विमुक्त जाती ), दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे व स्त्री तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेल्या कुटुंबांना या कामासाठी प्राधान्य दिले जाते.
प्रति दिन २४८ रुपये मजुरी
मनरेगाच्या कामावरील मजुरांना प्रति दिन २४८ रुपये मजुरी दिली जाते. वृक्ष लागवडीसाठी १०० दिवस कामे उपलब्ध करून दिली जातात. इतर कामे मोजमाप व कामानुसार मोबदल्याची रक्कम दिली जाते. विहिरीसाठी तीन लाख रुपयांपर्यंत कामानुसार रकमेची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील गरीब मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जाते. गरीब कुटुंब आर्थिक संकटात सापडू नये, यासाठी त्यांना कामे उपलब्ध करून दिली जातात.