नागपूर : आपण डीआरटी कोर्टासोबत जुळलेल्या सिग्मा कंपनीत रिकव्हरी ऑफिसर असल्याची बतावणी करून कमी किमतीत घर, फॉरे लिकर वाइन शॉपचे लायसन्स अन् कार मिळवून देण्याची बतावणी करून आरोपीने एका व्यक्तीला १ कोटी ८६ लाख ५६ हजारांनी गंडविले. ही घटना तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२२ ते २ डिसेंबर २०२२ दरम्यान घडली आहे.
किशोर कुमार सुंदरलाला (वय ४६, रा. प्लॉट नं. २०२, दुसरा माळा, पारिजात अपार्टमेंट, साईमंदिरमागे, विवेकानंदनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कदम रोशनलाल घई (वय ४९, रा. प्लॉट नं. ३१८, वर्धमाननगर) यांचे तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाखेत जुना भंडारा रोड येथे पॅराडाइज फुट वेअर नावाचे दुकान आहे. कदम यांच्या मुलाला लॅपटॉप घ्यायचा होता. मुलाच्या मित्राने त्यास आरोपी किशोर हा २० ते २५ टक्के कमी दराने वस्तू देत असल्याचे सांगितले. त्यामुळे कदम यांनी आरोपीची आपल्या दुकानात भेट घेतली. आरोपीने आपण डीआरटी कोर्टासोबत जुळलेल्या सिग्मा कंपनीत रिकव्हरी ऑफिसर असल्याचे सांगितले. आपल्या अधिकार क्षेत्रात १० ते १२ बँक असून, डीआरटी कोर्टातील वादग्रस्त प्रॉपर्टी असतात त्यांचा कोर्टाच्या आदेशाने जप्ती किंवा लिलाव होतो, तेथे आपली थेट ओळख असल्याचे सांगितले.
आरोपीने कदम यांना श्री इलेक्ट्रॉनिक्स धंतोली येथून ५८ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप ४० हजारांत मिळवून दिला. तसेच ॲक्टिव्हा गाडी २५ टक्के कमी दराने व कदम यांच्या भावाला बलेनो कार कमी किमतीत मिळवून दिल्यामुळे कदम यांचा आरोपी किशोरवर विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने गांधीबाग गार्डनजवळ चार कोटी किमतीची प्रॉपर्टी लिलावास आली असून, ती १ कोटी ४५ लाखांत मिळवून देतो, असे सांगितले. त्यामुळे कदम यांनी आरोपीच्या कॅनरा बँक खात्यात आरटीजीएसद्वारे १ कोटी ४१ लाख ६० हजार रुपये पाठविले. कदम यांनी आरोपी किशोरला व्यवहाराच्या पावत्या मागितल्या असता त्याने बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांच्या पावत्या दिल्या.
त्यानंतर आरोपीने कदम यांना फॉरेन लिकर वाइन शॉपच्या लायसन्सचे ऑक्शन होत असल्याचे सांगून ते कमी किमतीत मिळवून देण्यासाठी १२.४५ लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने दिलेल्या पावत्यांबाबत माहिती घेण्यासाठी कदम हे बँक ऑफ इंडियात गेले असता त्यांना आरोपीने दिलेल्या पावत्या खोट्या असल्याचे समजले. आरोपीला त्यांनी पैसे परत मागितले असता त्याने कॅनरा बँकेचे १ कोटी ८६ लाख ५६ हजार रुपये व २१ लाख ४१ हजारांचे दोन चेक दिले. परंतु ते चेकही बाउन्स झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तहसील पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४०६, ४६६, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
कदम यांचा मित्रही सापडला गोत्यात
आरोपी किशोर कमी किमतीत कार देत असल्याचे समजल्यामुळे कदम यांचा हिंगोली येथील मित्र सचिन गुंडेवार यांनी कार घेण्यासाठी कदम यांच्या खात्यात १४ लाख ५० हजार रुपये पाठविले. कदम यांनी आरोपी किशोरला गाडीसाठी १५ लाख रुपये पाठविले व रोख २.५० लाख रुपये दिले. परंतु आरोपीने गाडी न देता त्यांचीही फसवणूक केली आहे.
.............