नागपूर : महापालिकेत मागील २० वर्षांपासून कार्यरत १८९ कंत्राटी संगणक चालकांची सेवा संपुष्टात आणून नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आणला आहे. यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात बुधवारी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वात मनपा मुख्यालयातील हिरवळीवर धरणे आंदोलन करण्यात आले.
कार्यरत १८९ संगणक चालकांना तत्काळ किमान वेतनावर नियुक्त करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद टिंगणे यांच्यासह महासचिव रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, उपाध्यक्ष ईश्वर मेश्राम, सचिव संजय मोहरले, देवानंद वागमारे, योगेश नागे, कुनाल यादव, सत्यन चंदनखेडे, यांच्यासह कंत्राटी १८९ संगणक चालक उपस्थित होते.
कंत्राटी संगणक चालक सद्य:स्थितीत किमान वेतन अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार सरासरी रक्कम २०६६६ रुपये वेतन भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी आरोग्य विमा अशा सुविधा मिळतात. सध्या मनपाच्या कामकाजाचा बोजा याच कर्मचाऱ्यांवर आहे. असे असूनही प्रशासनाने नवीन कंत्राटदाराची नियुक्त करण्याचा प्रस्ताव आणला आहे. यात संगणक चालकाला दरमहा १५५०० रुपये मानधन प्रस्तावित आहे. नियमानुसार ते किमान वेतनात बसत नाही. हा कार्यरत संगणक चालकावर अन्याय आहे. त्यांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मागील १५ ते २० वर्षांपासून सेवा देत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वय ४० ते ५० वर्षे झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना बेरोजगार करणे योग्य नाही. मानतेच्या दृष्टिकोनातून सध्या मिळत असलेल्या मानधनावर त्यांना फेरनियुक्ती देण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.