पाणीपट्टी वसुलीचे अध्यक्षांचे आदेश : झोननिहाय वसुलीचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडे ३.८३ लाख ग्राहकांची नोंद आहे. यातील १.९४ लाख ग्राहकांकडे पाणीपट्टीचे १८९.३७ कोटी रुपये थकीत आहेत.
वित्त वर्षात २५ ऑगस्टपर्यंत ६१.७२ कोटीची वसुली झाली आहे. मागच्या वर्षी या कालावधीत ५३.३७ कोटींची वसुली झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ८ कोटींची वसुली अधिक असली तरी थकबाकी वसुली करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी गुुरुवारी आढावा बैठकीत दिले.
पाणीपट्टी हे एक महत्त्वाचे आर्थिक स्रोत आहे. कोरोनामुळे वसुली मोठ्या प्रमाणात थकली आहे. शासकीय विभागांकडेही कोट्यवधी रुपये बिलापोटी थकीत आहेत. ही वसुली तातडीने करणयाचे निर्देश दिले. बैठकीला जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे अधिकारी, जलप्रदाय विभागाचे आणि ओसीडब्ल्यूचे डेलिगेट्स उपस्थित होते.
झोनच्या अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुलीची माहिती दिली. झोपडपट्टी भागात बिल वसुली करताना येणाऱ्या अडचणी मनोज गणवीर यांनी सांगितल्या. कर वसुलीसाठी आता प्रत्येक झोनमध्ये जाऊन आढावा घेणार असल्याची माहिती भोयर यांनी दिली. शासकीय पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकीत असेल तर ती कशाप्रकारे त्याची वसुली करता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. वीज जशी गरजेची आहे, तसेच पाणीसुद्धा अत्यावश्यक आहे. त्यानुसार पाणी बिलाची वसुली वाढवा, असेही निर्देश दिले.