नागपूर : वेकोलित नोकरी करत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून बॅंकेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे. यासंदर्भातील मास्टरमाइंड असलेल्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला अटक करण्यात आली आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या इतवारी मस्कासाथ येथील बॅंकेत हा प्रकार घडला. गुलाम अशरफी ऊर्फ प्यारे अशरफी (४० वर्षे, रा. यादवनगर, बिनाकी, मंगळवारी) हा बॅंकेचा रिकव्हरी एजंट म्हणून काम करतो. लोकेश सर्पे (३५, बिनाकी, मंगळवारी) व इम्रान खान उस्मान खान (३५, बिनाकी, मंगळवारी) यांना अशरफी याच्या मालकीची स्थावर मालमत्ता विकत आहे, असे दाखविण्यात आले. या व्यवहारासाठी कर्जासाठी अर्ज करण्यात आला व दोघेही वेकोलि येथे नोकरीस आहे, असे सांगून त्यांचे बोगस ओळखपत्र, सॅलरी स्लिप, फॉर्म-१६, पगार बॅंकेत जमा होत असल्याचे विवरण बॅंकेत सादर करण्यात आले.
नियमानुसार बॅंकेतून या गोष्टींची पडताळणी होती. याची जबाबदारी थर्ड पार्टी असलेल्या ‘ॲस्ट्युट कॉर्पोरेट सर्व्हिस प्रा. लि.कडे होती. तेथील कर्मचाऱ्यांशीदेखील आरोपींनी संगनमत केले व त्यांनी बॅंकेत ‘ऑल इज वेल’चा सकारात्मक अहवाल सादर केला. बॅंकेने लोकेश व इम्रान यांना अनुक्रमे ८९ लाख व १ कोटींचे कर्ज मंजूर केले. कागदपत्रांची योग्य पडताळणी केली असता ही बाब समोर आली. यानंतर बॅंकेचे व्यवस्थापक संकेत प्रसाद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात तपास केला असता गुलाम अशरफी ऊर्फ प्यारे अशरफी हा मुख्य आरोपी असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला यशोधरानगरातून ताब्यात घेतले व लकडगंज पोलीस पुढील तपास करत आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गजानन राजमाने, सहा पोलीस आयुक्त संजय सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सुनील चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, मुकुंद वारे ही कारवाई केली.
बऱ्याच लोकांच्या फसवणुकीची शक्यता
मुख्य आरोपीने अशा पद्धतीने बऱ्याच जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्याच्या विरुद्ध बरेच तक्रारदार अर्ज घेऊन येत आहेत. जर कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या नावे त्याने कर्ज घेतले असल्यास दबावात न येता असा व्यक्तींनी समोर येऊन पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.