लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न समारंभ आणि विविध पार्टीसाठी होणाऱ्या गर्दीवर मनपा प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. सोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आर्थिक दंडही ठोठावला जात आहे. शुक्रवारी ६ मंगल कार्यालये, हॉटेलवर दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १.८९ लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींविरुद्ध गेल्या १६ फेब्रुवारीपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत २६७ मंगल कार्यालये, लॉन, सभागृह आदींची तपासणी मनपाच्या एनडीएस पथकातर्फे करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई केली जात आहे.
यांच्यावर केली कारवाई
वर्धा रोड, हिंदुस्थान कॉलनी येथील चंद्रमणी सभागृहावर २५ हजार रुपये, धरमपेठ येथील कुसुमताई वानखेडे सभागृहावर १० हजार रुपये, वर्धमाननगर येथील सात वचन लॉनवर १५ हजार रुपये, पारडी चौक येथील हॉटेल गोमतीवर ५ हजार रुपये, गोरेवाडा येथील श्याम लॉनवर २५ हजार रुपये आणि गोरेवाडा रोडवरील केसीआर लॉनवर २५ हजार रुपये दंड ठाेठावण्यात आला.