नागपूर : केंद्राच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यातील १९ जिल्ह्यांना मुरघास तयार करण्यासाठी सायलेज बेलर मशीन युनिटच्या खरेदीसाठी १ कोटी ९० लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे प्रत्येक जिल्ह्यासाठी १० लाख रुपयाचा निधी जमा झाला आहे. आता यासाठी लाभार्थी संस्था किंवा बचत गटांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा या १९ जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांची यासाठी निवड झाली आहे. या योजनेंतर्गत साधारण प्रवर्गातील लाभार्थींना लाभ दिला जाणार असून, प्रति युनिट २० लाख रुपयाच्या या योजनेत ५० टक्के वाटा केंद्र सरकार उचलणार आहे. उर्वरित १० लाख रुपये लाभार्थ्याने भरायचे आहे. यासाठी सहकारी दुग्ध उत्पादक संघ अथवा संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था, स्वयंसहायता बचत गट, गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्था यांना अर्ज करता येणार आहे. बीडीएस संगणक प्रणालीवर हा निधी उपलब्ध केला जाणार आहे. मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू आहे.
...
या योजनेसाठी निधी आला आहे. लाभार्थ्यांची निवड करायाची असल्याने संंबंधित संस्थांनी विहित नमुन्यामध्ये कार्यालयाकडे अर्ज सादर करावे. त्यातून लाभार्थी संस्थेची निवड केली जाईल. यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मार्च असून, पंचायत समिती कार्यालयांमध्ये हे अर्ज उपलब्ध आहेत.
- मंजुषा पुंडलिक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, नागपूृर
...
युनिटमध्ये असणार यांचा अंतर्भाव
या मुरघास निर्मिती युनिटमध्ये सायलेज बेलर, हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र (२ टन प्रति तास), ट्रॅक्टर ट्रॅली, वजन काटा, हार्वेस्टर आणि मशीन शेड यांचा समावेश असेल. यातील सायलेज बेलर आणि हेवी ड्युटी कडबा कुट्टी यंत्र खरेदी करणे बंधनकारक राहणार आहे.
...