योगेश पांडे
नागपूर : मनपाच्या विविध झोन कार्यालयांतून जमा केलेली रक्कम संबंधित बॅंक खात्यांमध्ये जमा न करता एका कंपनीतील कर्मचाऱ्याने १९ लाखांहून अधिक रोकड खिशात टाकून गोलमाल केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
त्रिमुर्ती नगर, कॉसमॉस टाऊन येथे रायटर बिझीनेस सर्व्हसेस प्रा.लि. या कंपनीचे कार्यालय आहे. संबंधित कंपनी ही राष्ट्रीयकृत बँक तसेच खाजगी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे टाकण्याचे तसेच वेगवेगळ्या व्यावसायिक संस्थांकडुन रोकड गोळा करून नमुद कॅश बँकेमध्ये डिपॉझीट करण्याचे काम करते. रोकड गोळा करण्याकरीता कंपनीची व्हॅन व कर्मचारी असतात. कंपनीत काम करणारा आरोपी रोहीत बेनीराम बोकडे (२९, बेसारोड, घोगली, प्रयासनगर) हा एटीएम सीआयटी ऑपरेटर या पदावर आहे. १६ नोव्हेंबर रोजी रोहीतने मनपाच्या लक्ष्मीनगर झोनमधून ४ लाख २९ हजार ८४८, मंगळवारी झोनमधून ७ लाख ९२ हजार ६७६ व नेहरूनगर झोनमधून ६ लाख ८४ हजार २९७ रुपयांची रोकड घेतली. त्याला ती रोकड मनपाच्या बॅक ऑफ महाराष्ट्र, सदर येथील खात्यावर जमा करायची होती.
मात्र त्याने १९ लाख ६ हजार ८२१ रुपयांची रक्कम संबंधित खात्यात जमाच केली नाही. त्याने त्याच्या सहकाऱ्याला रक्कम जमा केल्याच्या स्लीप दुसऱ्या दिवशी देतो असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्याने स्लीप जमा केल्या नाही. दरम्यान, बॅंक खात्यात पैसे जमा न झाल्याने बॅंकेकडून कंपनीला विचारणा केली. कंपनीचे शाखा प्रमुख शेखर मधुकर धनद्रव्ये (३३) यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र त्याचा फोन स्वीच ऑफ होता. प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी रोहीतविरोधात गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.