लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या जागतिक तापमानामुळे तसेच ओझनचा खालावलेला स्तर यामुळे देशात उष्णतेची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु वाढत्या तापमान वाढीमुळे सन २०१८ मध्ये हा आकडा वाढत जाऊन १९ एवढा झाला, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी येथे दिली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर तसेच मध्य भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची लाट नियंत्रित करण्याबाबतच्या नियोजनासाठी लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोक येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एनडीएमएचे सदस्य डॉ. डी. एन. शर्मा, लेफ्टनंट जनरल एन. एन. मारवाह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अरुण उन्हाळे, डॉ. दिलीप मालवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.मानव तसेच जनावरांचे उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू थांबविणे हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या हिट अॅक्शन प्लॅनचा मूळ उद्देश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यशाळेमुळे राज्य शासनाला उष्णता प्रतिबंधक आराखडा आणि उपाययोजना राबविण्यासाठी सहायभूत ठरेल. तेव्हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने उष्णतेमुळे प्रभावित राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित राज्यांनी याची आतापासूनच अंमलबजावणी सुरु करावी, असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी दिलेत.एनडीएमएच्यावतीने उष्णतावाढ प्रतिबंधासाठी तत्त्वानुसार हिट वेव्ह अॅक्शन प्लॅन तयार करुन त्याची व्यापक स्वरुपात प्रसिद्धी आणि अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेमध्ये भर देण्यात आला. सन २०१७ पासून राष्ट्रीय स्तरावर हिट वेव्ह अॅक्शन प्लॅन कार्यशाळा घेतल्या जातात. यंदाची नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली ही तिसरी कार्यशाळा होय.नागपूरसह विदर्भात उष्णतेचा प्रकोप वाढणारनागपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एनडीएमएमार्फत वातावरणातील बदल, दिवसेंदिवस उष्णतेचा वाढता प्रकोप यावर विशेष तज्ज्ञांमार्फत हिट वेव्ह अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. नागपूर तसेच मध्य भारताला यंदा अधिक तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने तीव्र उष्णतेचा तडाखा ज्या संबंधित राज्यांना बसू शकतो, अशा राज्यांना उष्णतेच्या प्रकोपापासून वाचविणे, अधिक तीव्र उष्णतेच्या नवीन ठिकाणांचा शोध घेणे तसेच सामान्य नागरिकांना यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता यावेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.