नागपूर : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्रच्या वतीने नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले. उद्घाटन सोहळ्यापासून ते विभिन्न चर्चासत्रे, कलाकृती, संगीतरजनी आणि समारोपीय सत्रातील थोरामोठ्यांच्या वक्तृत्वातून व्यक्त झालेली समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन साहित्याचे वारकरी मार्गस्थ झाले आहेत.
समरसता केवळ बोलण्याची, लिहिण्याची गोष्ट नव्हे तर ती कर्तृत्व साधण्याची शिदोरी होय. ही शिदोरी साहित्यात उतरली तर एकमेकांवर आगपाखड करण्याऐवजी त्यातून एकोपा कसा साधता येईल आणि ‘आम्ही तुम्ही बंधू बंधू’ हा भाव कसा जागवता येईल, याची प्रेरणा मिळेल, असा भाव ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’, ‘अण्णा भाऊ साठे : समतेचा पथिक’, ‘नव्वदोत्तर साहित्यातील समरसता’, ‘अण्णाभाऊंचे साहित्यविश्व : आकलन आणि आस्वादन’ या परिसंवादातून व्यक्त झाला. ‘विषमतेच्या विषातून समरसता निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंच्या जगण्या-मरण्यातील दु:ख, वेदना, संघर्ष आत्मसात करणे अपेक्षित’ असल्याची भावना संमेलनाच्या उद्घाटनीय सत्रात संमेलनाचे उद्घाटक माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केली होती.
तोच धागा पकडत संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी.. अण्णाभाऊंच्या साहित्यात जसा भटक्या विमुक्तांचा आवाज बुलंद होतो, तसाच वंचितांच्या, पिचलेल्यांच्याही वेदनेलाही पाझर फुटतो. त्यांच्या साहित्यातील स्त्री ही रणरागिणी असल्याचा भाव व्यक्त केला. संमेलनातून निघालेला हा सूर महत्त्वाचा असून त्याला संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी श्रीमद्भगवदगीतेतील पंचसूत्रांचा जागर करत कोणत्याही कामाला अधिष्ठान, कर्ता, साधने, क्रिया आणि दैव या पाच परिसांचा स्पर्श करण्याचे आवाहन केले. संमेलनातील ‘विषयनिष्ठ भाषण’, ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’, ‘संवाद : सामाजिक सृजनशीलतेशी’ आदी सत्रांतून भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाचा कानोसा घेण्यात आला. संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील साहित्यिक व साहित्यरसिक सहभागी झाले होते. साहित्यरसिकांसाठी साहित्याचे दालन दर्शनीय होते. साहित्य पालखी-दिंडीपासून ते समारोपापर्यंत सर्वच उपक्रमात समरसता हा विषय प्राधान्याने अंतर्भूत करण्यात आला होता.
क्रांतिवीर समशेर सिंग पारधी यांच्या स्मारकाला भेट
पारधी समाज व भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी आयुष्य खर्ची घालणारे संमेलनाचे मावळते अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे व संमेलन आयोजकांनी उमरेड तालुक्यातील समशेरनगर (चांपा) येथील क्रांतिवीर समशेर सिंग पारधी (भोसले) यांच्या स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी सरपंच आतिष पवार, अ. भा. आदिम महासंघाचे राष्ट्रीय महासचिव बबन गोरामन उपस्थित होते.