प्रवाशांच्या सुरक्षा वाऱ्यावर : परिवहन विभागात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात धावत असलेल्या महापालिकेच्या आपली बसच्या ताफ्यातील १९ बस फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही धावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आले. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
शहरात २९० बस ८५ मार्गावर धावत आहेत. यातील १८ रेड व एक मिनी बस फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही धावत आहेत. आरके सिटी बस ऑपरेटच्या या बसेस आहेत. महापालिकेची बससेवा चार ऑपरेटच्या माध्यमातून चालविली जात आहे. यात आरके सिटी बस ऑपरेटर, हंसा सिटी बस प्रा.लि. व ट्रॅव्हल टाइम सिटी बस अशा प्रमुख तीन ऑपरेटचा समावेश आहे. तर ६ इलेक्ट्रिक बस ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. यातील आरके सिटी बस ऑपरेटच्या १८ रेड बसला फिटनेस प्रमाणपत्र नाही. तसेच एका बसला पीयूसी प्रमाणपत्र नसतानाही धावत आहे.
बस संचालनासाठी परिवहन विभागाकडून फिटनेस व पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र प्रमाणपत्र नसतानाही या बसेस धावत असल्याने मनपाचा परिवहन विभाग प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.