निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या अवतीभवतीच्या सिमेंटच्या इमारती पाहताना यामध्ये झाडे किती असतील, याचा विचारही तुम्ही केला नसेल. मात्र यानंतर कुणी प्रश्न केला तर त्याचे हमखास उत्तर तुम्हाला देता येईल. किमान लाॅ काॅलेज चाैक ते बजाजनगर ते लाेकमत चाैक, रामदासपेठ ते व्हेरायटी चाैक या भागात राहणारे नागरिक हा आकडा नक्की सांगू शकतील. हाेय, या ३ चाैरस किलाेमीटरच्या परिघात स्थानिक व परकीय अशा १९१ प्रजातीचे १४,४७९ झाडे आहेत.
लाेकल बाॅयाेडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी एन्ड एक्शन प्लॅनअंतर्गत भारतातील काही शहरांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व ठाणे या शहराचा समावेश आहे. शहरी जैवविविधता टिकविण्यासाठी अशाप्रकारचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग असलेल्या वनस्पतीतज्ज्ञ प्राची माहुरकर यांनी या उपक्रमाबाबत लाेकमतशी बाेलताना माहिती दिली. या टप्प्यात लाॅ काॅलेज ते लाेकमत चाैकापर्यंतच्या परिघात जून २०२० ते नाेव्हेंबर २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कृषी विद्यापीठ तसेच महाराजबाग परिसराचाही समावेश आहे. अतिशय गांभीर्याने एकेका झाडाचे जिओटेकिंग करून रेकाॅर्ड नाेंदविण्यात आले आणि मृत झाडांचेही जिओग्रॅफिकल नाेटिफिकेशन घेण्यात आल्याचे प्राची यांनी सांगितले.
सुरुवातीला ८०-९० प्रजाती असतील असा अंदाज हाेता. पण पाहणी केली असता तब्बल १९१ प्रजाती आढळून आल्या. यामध्ये ११० स्थानिक तर ८१ विदेशी प्रजातींचा समावेश आहे. सेमिनरी हिल्स व अंबाझरी भागात सर्वेक्षण केल्यास ही संख्या ३०० च्या जवळपास जाण्याचा अंदाज प्राची यांनी व्यक्त केला. संपूर्ण शहरात ताे ४०० च्या घरात जाऊ शकताे.
नागपूर शहर अद्याप तरी पुणे, मुंबईप्रमाणे फुगलेले नाही. त्यामुळे संपूर्ण शहराच्या सर्वेक्षणाची संधी आहे. आम्ही त्याबाबत विनंती केली आहे. अशाप्रकारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कीटक अशा घटकांचेही सर्वेक्षण हाेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या शहरातील जैवविविधता सुदृढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे व ताे राबविणे शक्य हाेईल.
- प्राची माहुरकर, वनस्पतीतज्ज्ञ
करंज, रेन ट्रि, साल, टेटू, लाेणीफळ मुबलक
या परिघात असलेल्या झाडांमध्ये वड, पिंपळ किंवा आंबा अशा पुजनीय झाडांची संख्या कमी आहे पण परदेशी प्रजातीची संख्या अधिक आहे. पाम, लाल करंज, लक्ष्मीतरू, खारीयाल, लाेणीफळ, पीने या परदेशी झाडांसह साल, टेटू, खिरणी, नागचाफा, बेलपत्ता, काली शिवन, कृष्णवड, काेकम किंवा रातांबा, तेजपत्ता, करमाळ, आमरी, रतनगुंज अशा स्थानिक झाडांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. याशिवाय कृषी विद्यापीठ व महाराजबाग परिसरात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. मात्र रस्त्याच्या कडेला वेगाने वाढणाऱ्या शाेभेच्या परदेशी झाडांची संख्या अधिक दिसून येत आहेत.