नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर इटारसी एण्डकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाने बेवारस स्थितीत ठेवलेल्या देशी आणि विदेशी दारूच्या १९६ बॉटल्स जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या दारूची किंमत १३ हजार २३ रुपये असून यातील आरोपी मात्र फरार झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा, बिक्रम यादव यांना एक व्यक्ती दारूची तस्करी करीत असल्याची गुप्त सूचना मिळाली. ही माहिती त्यांनी आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी एक चमू गठित केली. या चमूतील आरपीएफ उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, आरपीएफ जवान विकास शर्मा, बिक्रम यादव, विनोद राठोड, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे, संजय खंडारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहायक दुय्यम निरीक्षक आर. एन. ठोंबरे, आशिष फाटे, अमोल बोथले यांनी प्लॅटफार्म क्रमांक ३ वर तपास सुरू केला. यावेळी त्यांना इटारसी एण्डकडील भागात बसण्याच्या बाकड्याच्या खाली दोन बॅग बेवारस अवस्थेत आढळल्या. बॅग जप्त करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आल्या. त्यात आॅफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या ७५० मिलिलिटरच्या १२ बाटल्या, आॅफिसर चॉईसच्या ९० मिलिलिटरच्या ८० बॉटल आणि देशी दारू रॉकेट कंपनीच्या १०४ अशा एकूण १९६ बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १३ हजार २३ रुपये आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकावर दारूच्या १९६ बेवारस बॉटल्स जप्त
By admin | Published: September 11, 2016 2:14 AM