लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेना व भाजपची युती झाली तेव्हा १९८९ साली मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत आपणही उपस्थित होतो. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे त्याचवेळी ठरले होते. त्यानुसार १९९५ ते ९९ या काळात भाजपने मुख्यमंत्रिपद मागितल्याचं कधीच आम्ही पाहिलं नाही. मग अचानक निकालानंतर शिवसेनेने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद कसे मागितले, असा सवाल उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
विदर्भ दौऱ्यावर असलेले राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. त्याचवेळी उद्धव यांनी आक्षेप का घेतला नाही? चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी उद्धव यांनी आधीच का सांगितल्या नाहीत, असा सवालही त्यांनी केला.