जंगल सफारीची धूम : पेंचच्या खजिन्यात तीन महिन्यात ४९ लाखनागपूर : मागील काही वर्षांत लोकांचा निसर्ग पर्यटनाकडे प्रचंड ओढा वाढला असून यातून वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) खजिन्यात चांगलीच भर पडू लागली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एफडीसीएमला मागील तीन वर्षांत या निसर्ग पर्यटनातून सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. वन विभागाने विदर्भातील ताडोबा-अंधारी, मेळघाट, नवेगांव-नागझिरा व बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात नऊ निसर्ग पर्यटन संकुलांचा विकास केला आहे. शिवाय येथे निसर्ग पर्यटनासाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व सुविधांसाठी आॅनलाईन आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. वन विभागाच्या या निसर्ग पर्यटन संकुलास पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वन विभागाने या सर्व संकुलांचा विकास करून ते एफडीसीएमकडे हस्तांतरित केले आहेत. त्यानुसार या सर्व संकुलांचे संचालन एफडीसीएमच्या माध्यमातून केले जात आहे. यातून एमडीसीएमला २०१२-१३ या वर्षांत १८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच २०१३-१४ या वर्षी तो ८० लाख ५६ हजारांपर्यंत वाढून २०१४-१५ मध्ये ११८ लाख ५९ हजार रूपये वसूल झाले आहे. शिवाय यात दरवर्षी पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय एप्रिल २०१६ ते जून २०१६ दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी, कोलितमारा, चोरबाहुली, सालेघाट, खुर्सापार व सुरेवाणी येथील पर्यटकांचा विचार करता या तीन महिन्यात तब्बल ८ हजार ५ पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. तसेच बोरधरण येथे २ हजार ११२, उमरेड-कऱ्हांडला येथे ८ हजार ३९५ आणि टिपेश्वर येथे ३ हजार २६१ पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तसेच यातून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाला ४९ लाख १८ हजार ८४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षभरात ९२ हजार १५६ पर्यटकांनी जंगल सफारी केली असून, यातून पेंच कार्यालयाला ९२ लाख ३७ हजार ३०४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. (प्रतिनिधी)
निसर्ग पर्यटनातून दोन कोटींचा महसूल
By admin | Published: September 10, 2016 2:29 AM