नरेंद्र कुकडे
हिंगणा (नागपूर) : दोन मित्रात वेणा नदीच्या पात्रात पोहण्याची पैज लागली. यातील एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला तर दुसरा थोडक्यात बचावला. हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसरात मंगळवारी (दि.१३) ही घटना घडली. रवींद्र मनोहर बारापात्रे (३४) रा. कोतेवाडा असे मृतकाचे नाव आहे. रवींद्रचा मृतदेह बुधवारी (दि.१४) रोजी दुपारी २ वाजता गुमगाव-कोतेवाडापासून ७ कि.मी.अंतरावर पेठ देवळी शिवारात आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कोतेवाडा येथील रवींद्र मनोहर बारापात्रे व त्याचा मित्र सूरज नारायण चाफेकर (४०) हे दोघे दारु पिऊन होते. या दोघांनी वेणा नदीत पोहण्याची पैज लावली. यानंतर दोघांनी कोतेवाडा-गुमगाव दरम्यान असलेल्या पुलावरून वेणानदीच्या पात्रात पोहण्यासाठी उडी घेतली. त्या पैकी सूरज चाफेकर हा नदीपात्रातून अर्धा कि.मी. अंतरावर स्मशानभूमीच्या बाजूला पोहत बाहेर निघाला. मात्र रवींद्र मनोहर बारापात्रे पुढे वाहत गेला. याबाबतची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. हिंगणा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. कोतेवाडा ग्रामपंचायत मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रवींद्र हा नदीत उडी मारतानाची नोंद झाली आहे.
पूर वाढल्याने शोधकार्य थांबले
मंगळवारी दुपारनंतर या घटनेची माहिती मिळताच कोतेवाडाचे माजी सरपंच रवींद्र आष्टणकर यांनी गावातील काही तरुणांच्या मदतीने वेणा नदीच्या काठावर दूरपर्यंत रवींद्रचा शोध घेण्यात आला. त्यानंतर या भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीचा पूर वाढला. त्यामुळे शोधकार्य थांबले.
७ कि.मी. अंतरावर मिळाला मृतदेह
बुधवारी सकाळी हिंगणा पोलीस व ग्रामस्थांनी रवींद्रचा शोध सुरू केला. नदीला पूर असल्याने रवींद्र वाहत दूर जाऊ शकतो असा अंदाज होता. त्यामुळे हिंगण्याचे ठाणेदार काळे यांनी बुटीबोरीचे ठाणेदार भीमा पाटील यांना याबाबत माहिती दिली. बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठ देवळी शिवारात काही गावकऱ्यांना रवींद्रचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांनी बुटीबोरी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रवींद्रचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.