नागपूर : रस्ता अपघातांमध्ये दरवर्षी जवळपास १२ हजार प्रवाशांचा मृत्यू होतो. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीणने कारवाईचा बडगा उगारला आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असलेल्या २६ बसेवर कारवाई करीत १ लाख ९४ हजार २५० रुपयांचा दंड आकारला आहे. विशेष म्हणजे, यात खासगीसोबतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचा समावेश आहे.
राष्ट्रीय महामार्गासह, राज्य मार्ग व इतर सर्व प्रमुख मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे, शहरात वाहतूक पोलीस नियंत्रित करीत असलेल्या सर्वच चौकात अवैध प्रवासी वाहतूक चालते. काळ्यापिवळ्या व्हॅनमध्ये चालकासह आठ प्रवाशांची अनुमती आहे. मात्र प्रत्यक्षात १२ ते १५ प्रवासी त्यात कोंबले जातात. चालकाशेजारी एक आसन असताना तेथे तिघांना बसविले जाते. चालकाला गिअर बदलणे, ब्रेक दाबणे व स्टिअरिंग फिरविणे सुद्धा त्यामुळे अत्यंत अवघड असते. परिणामी अपघाताची शक्यता वाढते. तीन, पाच आसनी रिक्षा व मिनीडोअर वाहनांचीही अशीच स्थिती आहे. तर जिल्हाबाहेर व आंतर राज्य वाहतूकमध्येही आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात. विशेष म्हणजे, चालकाच्या बाजूला, बसच्या मध्यभागात टेबल टाकून व उभ्याने प्रवाशांची वाहतूक केली जाते. याची दखल घेत ग्रामीण आरटीओ कार्यालयाने सर्व सीमा तपासणी नाक्यांवर बसची तपासणी करण्याचा सूचना भरारी पथकाला दिल्या. त्यानुसार २६ बसेसवर कारवाई करण्यात आली. यात १६ बसेस मध्य प्रदेशातील आहेत. या शिवाय, ऑक्टोबर ते १० डिसेंबर या कालावधीत २५९ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करीत ८० लाख ९० हजार ८४३ दंड आकारला आहे.
-कारवाईचा वेग वाढविणार
अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा वेग वाढविला जाणार आहे.
-बजरंग खारमाटे
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर