वर्षभरात कचऱ्याची विल्हेवाट : बायोमायनिंग ठरले उपयुक्त
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील २२ हेक्टर जमीन कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निरुपयोगी झाली आहे. यार्ड कचरामुक्त करण्यासाठी मनपाने विविध उपाय केले, मात्र यात यश आले नाही. परंतु वर्षभरापूर्वी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग केले जात आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. वर्षभरात दोन लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
मनपाने बायोमायनिंगचा जिग्मा कंपनीला वर्षभरापूवीं कंत्राट दिला होता. तीन वर्षात भांडेवाडी कचरामुक्त करण्याचे कंत्राट आहे. पहिल्या वर्षात कंपनीचे उद्दिष्ट थोडे मागे आहे. परंतु दुसऱ्या वर्षात बायोमायनिंगची गती वाढविली जाईल, असा दावा कंपनीने मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाकडे केला आहे.
भांडेवाडी कचरामुक्त व्हावी, यासाठी पूर्व नागपुरातील नागरिकांनी संघर्ष केला, परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यानंतर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रस्ताव आणला. परंतु प्रदूषणाची शक्यता लक्षात घेता हा प्रकल्प बारगळला. त्यानंतर बायोमायनिंग पद्धत आणली. याचे चांगले परिणाम दिसत आहे.
...
बायोमायनिंगची अशी आहे प्रक्रिया
कचऱ्याच्या विंडो रो बनविल्या जातात. त्यावर बायोकल्चर शिंपडले जाते. यामुळे कचरा नष्ट होतो. तर कपडे, प्लास्टिक, मातीसह अन्य पदार्थ वेगवेगळे केले जाते. ही पद्धत उपयुक्त ठरत आहे.
.....
जमीन अमूल्य आहे
ज्या २२ हेक्टर जमिनीवर कचऱ्याचा ढीग लागला आहे, ती जमीन किमती आहे. ही जमीन खाली करण्यात यश आले तर येथे महत्त्वाचा प्रकल्प उभा करता येईल. कचऱ्याच्या ढिगामुळे ती निरुपयोगी बनली आहे.
...
निर्धारित कालावधीत काम पूर्ण होईल
बायोमायनिंगचा कंत्राट तीन वर्षाचा आहे. निर्धारित कालावधीत डम्पिंग यार्ड कचरामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.