नागपूर : काेणत्याही परिस्थितीत माता आणि तिच्या पाेटातील गर्भाला सुरक्षित ठेवणे व सुदृढ बाळ जन्माला घालणे हे डाॅक्टरांचे पहिले प्राधान्य आहे. मात्र, पाेटातील गर्भ अतिशय नाजूक असतो व कधी काेणताही डिफेक्ट निर्माण हाेण्याची भीती असते. त्यामुळे डाॅक्टरांचे कायम लक्ष असावे. त्यासाठी गर्भाच्या १८ ते १९ आठवड्यांत दुसरे ट्रायमिस्टर स्कॅन नितांत गरजेचे आहे व टळू देऊ नये, असे आवाहन बंगलोरच्या प्रसिद्ध स्त्रीराेग तज्ज्ञ डाॅ. प्रतिमा राधाकृष्णन यांनी केले. (A 2-T scan is essential for the birth of a healthy baby, Dr Pratima Radhakrishnan)
शेंभेकर हाॅस्पिटल प्रा. लिमिटेडच्या ओमेगा हाॅस्पिटल व ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फिटल मेडिसिन युनिट व ॲस्थेटिक गायनाे केअर सेंटरचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त आयाेजित परिषदेदरम्यान डाॅ. शीला माने, डाॅ. कुंदन इंगळे, डाॅ. सेजल अजमेरा, ओमेगाचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. चैतन्य शेंभेकर, सहसंचालक डाॅ. मनीषा शेंभेकर, डाॅ. अल्का मुखर्जी, डाॅ. नीलेश बलकवडे, डाॅ. राेहन पालशेतकर, डाॅ. आशिष झरारिया, डाॅ. आशिष कुबडे उपस्थित हाेते. डाॅ. राधाकृष्णन यांनी पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशनद्वारे गर्भाची वाढ व २-टी स्कॅनचे महत्त्व सांगितले. गर्भाचे नाक, चेहरा, डाेळे, डाेके, मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर, पाठीचा मणका, मूत्रपिंड, हात-पाय, आदी कुठल्याही अवयवात इन्फेक्शन किंवा काेणत्या समस्या निर्माण हाेऊ शकतात, याबाबत माहिती देत आणि १८-१९ व्या आठवड्यात दुसऱ्या ट्रायमिस्टर स्कॅनमध्ये ते शाेधणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. संशय असेल तर पुन्हा करा, पण दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. निदान झाल्यावर उपचार करण्यासह पालकांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. डाॅक्टरांनी नव्या तंत्रज्ञानाबाबत कायम अपडेट राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
डाॅ. शीला माने यांनी सन्मानजनक मातृत्वाची काळजी हा महिलेचा अधिकार असल्याचे सांगत नातेवाईक, समाज, रुग्णालये आणि डाॅक्टरांसह आराेग्य सेवकांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. डाॅ. सेजल अजमेरा यांनी बदलत्या जीवनशैलीत बदललेल्या स्त्री संकल्पना तसेच रेडिओफ्रिक्वेन्सी पद्धतीद्वारे उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डाॅ. पालशेतकर यांनी गर्भधारणेदरम्यान हाेणाऱ्या समस्या व त्यावरील उपचाराबाबत माहिती दिली. डाॅ. पारूल सावजी यांनी उद्घाटन सत्राचे संचालन केले.