नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामागील मुख्य कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या निवृत्तीला २८ महिने बाकी होते. ते खंडपीठात २०१७ पासून कार्यरत होते.नागपूरकर न्या. देव यांची २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. ते ४ डिसेंबर, २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार होते, परंतु त्यापूर्वीच ते सेवामुक्त झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ३१ वर्षे वकिली व्यवसाय केला. न्या. देव यांनी शुक्रवारी कोर्टात वकिलांना राजीनाम्याची माहिती दिली. न्या. देव यांनी न्यायालयामध्ये बोलताना, ते आत्मसन्मानाच्या विरोधात जाऊन कार्य करू शकत नाहीत, असे म्हटल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. न्या. देव यांनी हा मेसेज चुकीचा असल्याची माहिती दिली.
कोणते निर्णय दिले?- न्यायमूर्तिद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांच्या न्यायपीठाने १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी दहशतवादी कारवाया प्रकरणी आरोपी कथित नक्षलवादी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी. एन. साईबाबा व चार साथीदारांना निर्दोष सोडले होते. - १९ एप्रिल, २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करून हे प्रकरण कायद्यानुसार, निकाल देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविले. काही दिवसांपूर्वी याच न्यायपीठाने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवरील हजारो कोटींचा दंड रद्द करणाऱ्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.
मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. माझी कोणाविषयी तक्रार नाही. मी ई-मेलद्वारे थेट राष्ट्रपतींना राजीनामा पाठविला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना राजीनामा दिल्याचे कळविले आहे. - न्या. रोहित देव, नागपूर.