नागपूर : नागपुरात आतापर्यंत वीस जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. लम्पी हा आजार जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून कोविडच्या धर्तीवरच उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील बडेगाव व उमरी जांभळा पाणी तसेच हिंगणा तालुक्यातील जुनेवाणी येथील गुरांना लम्पीसदृश लक्षणे आतापर्यंत दिसून आली आहेत. ही संख्या वीस आहे. बडेगाव येथील बैल सदृश आजारामुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तथापि, हा आजार जनावरांपासून माणसात पसरण्याची शक्यता नाही. अशा पद्धतीचे कोणतेही तथ्य अद्याप मानण्यात आलेले नाही, त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही.
या आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून कोविडच्या धर्तीवर ज्या गावात अशी जनावरे आढळून आली आहेत. त्याच्या पाच किमी परिसरात जनावरांचे लसीकरण केले जात आहे. नागपुरात असे १० हजार जनावरांच्या लसीकरण केले जाणार असून आतापर्यंत ४ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील गुरांची खरेदी-विक्री बंद करण्यात आली असून गुरांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहन खंडारे उपस्थित होते.
- डीपीसीतून एक कोटी रुपये खर्च करण्यास परवानगी
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी डीपीसीमधून एक कोटी रुपये खर्च करण्यास परवानगी मिळाली असल्याचेही जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले.