पालकमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार : महानिर्मिती व स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यांच्यात सामंजस्य करारनागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत महादुला कोराडी परिसरात २० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याबाबत महानिर्मिती व स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोराडी या नावाने हे रुग्णालय ओळखले जाईल. यात २४ तास आकस्मिक आरोग्य सुविधा राहील. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या कोराडी वीज प्रकल्पाला पर्यावरणविषयक परवानगी देतांना केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने काही अटींचे अधीन राहून परवानगी दिली होती. त्यानुसार कोराडी वीज प्रकल्पाच्या प्रभावित परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेकरिता सुरुवातीला २० खाटांचे रुग्णालय महानिर्मितीने सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत सुरू करण्याचे ठरविले. यापूर्वी महानिर्मिती व आॅरेंज सिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर नागपूर यांच्यात करार झाला होता. एक वर्ष बाह्य रुग्ण विभाग देखील सुरू करण्यात आला होता. त्यास येथील नागरिकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता पुढील वैद्यकीय सेवा मल्टी स्पेशालिटी स्वरुपात देण्यात यावी, ही भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली होती. कोराडी वीज प्रकल्प प्रभावित परिसरातील नागरिकांना उत्तम प्रकारची आरोग्य सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी, याकरिता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार गेतला व महानिर्मितीच्या सांघिक सामांजिक जबाबदारी अंतर्गत आणि स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी जि. नागपूर यांच्यासमवेत बैठका व चर्चेनंतर गुरुवारी बिजलीनगर येथील अतिथीगृहात या ऐतिहासिक सामंजस्य करारावर दोन्ही पक्षातर्फे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. येत्या १५ जुलैपर्यंत हे रुग्णालय सुरु करण्यात निश्चित झाले. याप्रसंगी महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर राऊत, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय अस्वले, कल्याण अधिकारी भालचंद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, तर स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे डॉ. दिलीप गुप्ता, उल्हास बुजोणे, दत्ता सगदेव, ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयाचे राजेश गोल्हर, स्वीय सहायक डॉ. दीपक खिरवडकर, डॉ. वैभव कारेमोरे, अमरजित गोडबोले हे प्रामुख्याने उपस्थित होते. या रुग्णालयाकरिता आवश्यक इमारत, पायाभूत सोयी सुविधा, यंत्रसामग्री, अद्ययावत रुग्णवाहिका इत्यादी सुविधा महानिर्मितीकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबीय, कर्मचारी, कंत्राटी कामगार, प्रभावित परिसरातील नागरिकांना या रुग्णालयातून सवलतीच्या दराचा लाभ घेता येईल. याकरिता ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. संबधितांनी ऊर्जाभवन कोराडी येथीस कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयातून नि:शुल्क विनंती अर्ज घेऊन जावे व रितसर अर्ज भरून कल्याण अधिकारी कोराडी यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
महादुला कोराडीत साकारणार २० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय
By admin | Published: May 27, 2016 2:46 AM