नागपूर : कत्तलीसाठी नेत असलेल्या २० गोवंशाची सुटका करून पारडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करीत १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चालक फिरोज खान रफिक खान (४५, रा. सेलु बाजार, ता. मंगरुळपीर जि. वाशिम), गजानन तुकाराम गजभार (४५) आणि मोहम्मद फाजील मोहम्मद अतिक (२३) दोघे रा. चिंचाळा, ता. मंगळुरपीर जि. वाशिम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पारडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हैदराबाद बायपास हायवे रोडवर जोगींदर ढाब्याजवळ सहा चाकी कंटेनर थांबवून पाहणी केली असता त्यात २० गोवंश कोंबून त्यांची वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसले.
आरोपींना वाहतुकीचा परवाना व कागदपत्र मागितले असता त्यांनी ते सादर केले नाही. त्यांच्या ताब्यातून २० गोवंश आणि वाहन असा एकुण १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ५ (ब), ९, ९ (ब), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६, सकलम ११ (१) (ड) (फ) प्राणी क्रुरता अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.