लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने नागपूरच्या व्यापाऱ्याची २० लाख रुपयाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.१५ नोव्हेंबर २०१५ ते ७ मे २०१९ दरम्यान वर्धमाननगर येथील रहिवासी गौतम भारतभूषण कोलबी (३६) यांच्यासोबत ही फसवणुकीची घटना घडली. कोलबी यांचे कुही येथे फार्म आहे. त्यांनी नवीन उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्लॉटजवळच केमिकल डोअर आणि इतर वस्तू बनविण्यासाठी त्यांना मशीनची आवश्यकता होती. ते त्यांच्या ओळखीचे गोविंद बत्रा यांच्याकडे गेले. त्यांच्या माध्यमातून दिल्ली येथील आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सबीब यांच्या मे. सिल्क अरेना कंपनी एल/१७१/५ नुरानी मशीदजवळ संगम विहार न्यू दिल्ली यांच्याशी संपर्क साधून कोटेशन मागविले. कंपनीकडून त्यांना कोटेशन मिळाले. कोलबी यांचा विश्वास बसल्यावर त्यांनी मशीनची ऑर्डर दिली. ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीचे संचालक मोहम्मद सलीम यांच्या म्हणण्यावर कोलबी यांनी त्यांनी सांगितलेल्या खात्यात १५ फेब्रुवारी २०१६ रोजी ६ लाख रुपये आणि २४ फेब्रुवारी २०१६ रोजी १४ लाख ७५ हजार ७०० असे एकूण २० लाख रुपये मोहम्मद सलीम यांच्या खात्यात जमा केले. परंतु त्यांनी मशीन पाठविली नाही. तसेच अन्य आरोपी महेश प्रल्हाद सराफ रा. शास्त्री अपार्टमेंट वैष्णव देवी चौक याने फिर्यादीची संमती न घेता इन्व्हाईस चालानवर सही करून मशीन प्राप्त झाल्याचे दर्शविले. अशाप्रकारे दोघांनीही संगनमत करून व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच कोलबी यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.