लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या कोरोना वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरमध्ये लक्षणे आढळून आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. परंतु सोमवारी त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्याच्यासोबत इतरही डॉक्टरांना दिलासा मिळाला. गेले दोन दिवस नागपुरात एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. परंतु संशयित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी मेडिकलमध्ये १६ तर मेयोमध्ये ४ असे एकूण २० नवे संशयित रुग्ण दाखल झाले. सध्या या दोन्ही रुग्णालयात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ३८ नमुन्यांमधून ११ नमुने निगेटिव्ह आले आहेत.दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका महिला रुग्णाचे नमुने मेयोच्या प्रयोगाशाळेत तपासण्यात आले असता, त्या पॉझिटिव्ह आल्या. यामुळे विदर्भात आता कोरोना विषाणूबाधितांची संख्या सातवर पोहचली आहे. नागपुरात सोमवारी दिवसभरात ४४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ३८ संशयितांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील १६ रुग्णांना मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ या कोरोना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. यात दोन पुरुष व १४ महिला आहेत. संशयित पुरुष रुग्ण हा नेपाळ येथून तर एक महिला रशिया येथून प्रवास करून आलेली आहे. तीन रुग्ण अमेरिकेतून आले आहेत. यात एक वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. उर्वरित ११ महिला या पॉझिटिव्ह शिक्षिकेच्या संपर्कात आल्या आहेत. या रुग्णांसह मेडिकलच्या या वॉर्डात जुने पाच असे एकूण १८ संशयित रुग्ण भरती आहेत. मेयोमध्ये आज चार नवे संशयित रुग्ण दाखल झाले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.विदर्भात २५ नवे संशयित रुग्णविदर्भात सोमवारी २५ कोरोना विषाणूचे नवे संशयित रुग्ण दाखल झाले. यात मेडिकलमध्ये १६,, मेयोमध्ये चार, वर्धेत एक तर खामगाव रुग्णालयात तीन रुग्ण आहेत. या सर्वांचे नमुने नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. मंगळवारी यांचा अहवाल येण्याची शक्यता आहे.आणखी एका डॉक्टरला लक्षणेमेडिकलच्या आयसोलेश वॉर्डाशी संबंधित नसलेल्या एका निवासी डॉक्टरला ताप, सर्दी व खोकल्याची लक्षणे आढळून आलीत. यामुळे वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना वसतिगृहातच थांबण्याचा सल्ला दिला. प्राप्त माहितीनुसार, या डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आयसोलेशन वॉर्डात फेरफटका मारला होता. मंगळवारी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.आतापर्यंत ११७ संशयितनागपुरात आतापर्यंत ११७ कोरोना संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ८७ संशयितांना रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यातील तिघांवर मेडिकलमध्ये तर एका रुग्णावर मेयोमध्ये उपचार सुरू आहेत.
नागपुरात २० नवे संशयित रुग्ण दाखल : दिवसभरात ३८ नमुन्यांमधून ११ निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:24 AM
मेडिकलच्या कोरोना वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरमध्ये लक्षणे आढळून आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. सोमवारी मेडिकलमध्ये १६ तर मेयोमध्ये ४ असे एकूण २० नवे संशयित रुग्ण दाखल झाले. सध्या या दोन्ही रुग्णालयात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ३८ नमुन्यांमधून ११ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
ठळक मुद्देकोरोना संशयित डॉक्टर निगेटिव्ह