नागपूर : कोरोना संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून खोकला, ताप व वजन कमी होण्याची लक्षणे दिसून येत आहेत, त्यांची क्षयरोग (टीबी)तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत शहरात ४७ कोरोनाबाधितांची तपासणी केली असता १४ तर ग्रामीणमध्ये २५९ बाधितांची तपासणी केली असता ६ असे एकूण २० बाधितांना टीबीची लागण झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, एचआयव्हीबाधितांचीही कोरोनाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी एचआयव्ही नागपूर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्याकडे तसे लेखी आदेश नाहीत. परंतु त्यांनी आपल्या समुपदेशकांमार्फत बाधितांना लक्षणे दिसत असतील तर कोरोनाची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या निदेर्शानुसार टीबी रुग्णांची कोविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणीला सुरुवात झाली आहे. ४७ कोविड रुग्णांमधून २९.७८ टक्के रुग्णांना टीबी असल्याचे निष्पन्न झाले. याच धर्तीवर शहरातील ‘सारी’ म्हणजे, सिव्हिअरली ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’च्या २२१ रुग्णांपैकी ११ रुग्णांना टीबी असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात मात्र कोरोनाबाधितांना क्षयरोगाचे प्रमाण कमी आहे. २५९ बाधितांपैकी २.३१ टक्के रुग्णाना टीबी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, सारीच्या १०० रुग्णांमध्ये एकाही रुग्णामध्ये क्षयरोग आढळून आलेला नाही.
-काय आहे सर्वेक्षण
डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात क्षयरुग्ण व एडस रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने चमू नेमल्या असून, कोणत्या तालुक्यात कोणती चमू जाणार, सर्वेक्षण व तपासणी याचे नियोजन करण्यात आले आहे. क्षयरुग्ण तसेच एडस रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला का, या गटातील रुग्ण जोखीम गटात आहेत का, या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
-महिनाभरानंतरही प्रतिसाद नाही
नागपूर जिल्ह्यात २३ ऑक्टोबरपासून या तपासणीला सुरुवात झाली. परंतु शहरासोबतच ग्रामीण भागात क्षयरोगाच्या तपासणीला कोरोनाबाधित व सारीचे रुग्ण नकार देत असल्याचे समोर आले आहे. यातच अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रत्येक रुग्णाला गाठणे विभागाला कठीण होत असल्याचेही चित्र आहे.
-पोस्ट कोविड रुग्णांचीही तपासणी
ज्यांना कोरोना होऊन गेला अशा ‘पोस्ट कोविड’ रुग्णांचीही क्षयरोगाची तपासणी केली जात आहे. परंतु अनेक रुग्ण आम्हाला लक्षणे नसल्याचे सांगून तपासणी करण्यास नकार देत आहेत. जे कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत त्यांची तपासणी सुरू आहे.
-शिल्पा जिचकार
क्षयरोग अधिकारी, मनपा
-शहरातील टीबी रुग्ण ४,६२५
-शहरात कोरोनाच्या ४७ रुग्णांमधून टीबीचे १४ रुग्ण
-ग्रामीणमध्ये कोरोनाच्या २५९ रुग्णांमधून टीबीचे ६ रुग्ण