लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २० नागरिकांना १० हजार रुपयांचा दंड केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३७,७३२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ७२ लाख २५ हजाराचा दंड वसूल केला आहे.
सोमवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १, हनुमाननगर २, नेहरुनगर ५, गांधीबाग ४, सतरंजीपुरा २, लकडगंज २ आणि आशीनगर झोन अंतर्गत ४ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३२,२६२ नागरिकांकडून १ कोटी ६१ लक्ष ३१ हजार वसूल करण्यात आले आहे. नागपुरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे.