लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांपासून अगदी व्रत स्वीकारल्यासारखे आय क्लीन नागपूरचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील एका ठिकाणाला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. या रविवारी त्यांनी अंबाझरी तलावाकडे मोर्चा वळविला आणि तलावाच्या परिसरातून नाही नाही म्हणत तब्बल २० बॅग प्लास्टिकचा कचरा गोळा केला.एकीकडे शासनाने प्लास्टिकबंदी लावली आहे, मात्र या बंदीचा फार प्रभाव जनमानासात दिसून येत नाही. आजही सर्रासपणे प्लास्टिकचा उपयोग केला जातो आणि कुठेही फेकले जाते. सौंदर्ययुक्त परिसराचीही पर्वा केली जात नाही. अंबाझरी उद्यान आणि तलावाचा परिसर पर्यटक आणि प्रेमीयुगुलांसाठीही आवडीचे ठिकाण आहे. मात्र येथे येणाऱ्यांना नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत कोणतेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. जवळ असलेला कचरा अगदी बेमुर्वतपणे कुठेही फेकायचा या प्रवृत्तीचे ग्रहण या तलावाच्याही सौंदर्याला लागले आहे. ही बाब आय क्लीन टीमच्या लक्षात आली. दर रविवारी न चुकता एखादे स्थान निश्चित करून त्याच्या सौंदर्यासाठी वेळ आणि श्रम देणाºया स्वयंसेवकांनी १४ एप्रिल रोजी अंबाझरी परिसरात अभियान राबविले. २० ते २५ स्वयंसेवक कामाला लागले आणि संपूर्ण परिसरातून प्लास्टिकचा कचरा गोळा केला. २० बॅग भरतील एवढा प्लास्टिकचा कचरा या सदस्यांनी गोळा केला आणि परिसर प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त केला. या स्वयंसेवकांना स्वच्छता करताना पाहून फिरायला आलेले नागरिकही या अभियानात सहभागी झाले.वंदना मुजुमदार आणि संदीप अग्रवाल यांच्या नेतृत्वात आय क्लीनची टीम गेल्या तीन वर्षापासून न चुकता दर रविवारी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी वेळ आणि श्रम देत आहे. एखादी मोठी भिंत असलेले ठिकाण निवडायचे. रविवारी सकाळी तेथे गोळा व्हायचे. आधी ते ठिकाण स्वच्छ करायचे आणि मग दुरवस्था झालेली भिंत रंगवायची. त्यावर वार्ली चित्रकारिता साकारायची. अशाप्रकारे या टीमने एक-दोन नव्हे तर तब्बल १५८ ठिकाण रंगविले व त्या स्थानाचे सौंदर्य खुलविले आहे. यासाठी लागणारा आर्थिक निधी जमविण्यापासून कुणी सहकार्य करो अथवा करू नये, आपले काम करीत जायचे. आय क्लीनच्या टीममध्ये ज्येष्ठही आहेत आणि तरुणही. विशेषत: दर अभियानात तरुण या कार्याशी जुळत असून, हेच या टीमचे यश आहे.
अंबाझरी तलाव परिसरातून काढला प्लास्टिकचा २० बॅग कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 9:43 PM
गेल्या काही वर्षांपासून अगदी व्रत स्वीकारल्यासारखे आय क्लीन नागपूरचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील एका ठिकाणाला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. या रविवारी त्यांनी अंबाझरी तलावाकडे मोर्चा वळविला आणि तलावाच्या परिसरातून नाही नाही म्हणत तब्बल २० बॅग प्लास्टिकचा कचरा गोळा केला.
ठळक मुद्दे‘आय क्लीन नागपूर’चा स्तुत्य उपक्रम : आतापर्यंत १५८ ठिकाणी सौंदर्यीकरण