लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोप ही मानवीय जीवनाची मूलभूत गरज आहे. परंतु पुरेशी झोप न झााल्यास विविध आजाराच्या धोक्यासोबतच मोठमोठे अपघातही होतात. भारतात रस्ता अपघाताचे प्रमाण मोठे आहे. अपघातासाठी निद्रानाश हेही एक कारण आहे. साधारण २० टक्के अपघात हे पुरेशी झोप न झाल्याने होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे, अशी माहिती इंग्लंड येथील रॉयल कॉलेजचे प्राध्यापक व छातीरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद सोवनी यांनी येथे दिली.गेटवेल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रेस्पिरेटरी, क्रिटिकल केअर स्लीप मेडिसीन व इंटरव्हेन्शनल प्लमोनोलॉजी विभागातर्फे ‘साऊथ ईस्ट एशिया अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसीन’यांच्या सहकार्याने झोपेच्या विकारावर दोन दिवसीय पाचवी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.डॉ. सोवनी म्हणाले, पुरेशी झोन न झाल्यास मेंदूला विश्रांती मिळत नाही. अशावेळी एखादा वाहनचालक जेव्हा वाहन चालवितो तेव्हा त्याचे जेवण झाल्यावर किंवा रात्री २ ते ४ वाजेच्यादरम्यान त्याच्या मेंदूची जागरूकता कमी होते. परिणामी, अचानक झोप येऊन रस्ता अपघात होतात. यामुळे प्रत्येकाने झोपेचे महत्त्व समजायला हवे, असेही ते म्हणाले. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत आयोजन सचिव डॉ. राजेश स्वर्णकार, डॉ. दीपक मुथरेजा, डॉ. अनिल सोनटक्के, डॉ. डेव्हिड कनिंग्टन, डॉ. केव्हिन काप्लान, डॉ. सांचेझ डे ला तोरे, डॉ. लार्न ओग्युन्येन, डॉ. दिलीप श्रीनिवासन, डॉ. हिमांशु गर्ग, डॉ. प्रतिभा डोग्रा आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.झोपेत श्वासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष नको- डॉ. स्वर्णकारडॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले,‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप अॅपनिया’ एक सामान्य समस्या आहे. यात झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया प्रभावित होते. फुफ्फुसांमध्ये सामान्य पद्धतीने हवा प्रवाहित होत नाही. हवेचा प्रवाह मार्गात अडथळा येत असल्याने जीभ आणि घशाच्या मागे असलेले ‘सॉफ्ट टिश्यूज’ नष्ट होतात. ‘अॅपनिया’ याचा अर्थ श्वास घेता न येणे असा होतो. म्हणजे काही सेकंदासाठी श्वास घेणे बंद होते. यामुळे झोपेतून अचानक जाग येते. ‘अॅपनिया’ची अनेक कारणे असू शकतात. वेळीच यावर उपचार न घेतल्यास गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. अलीकडे तरुणांमध्येच नाहीतर लहान मुलांमध्येही या आजाराचा धोका वाढला आहे. लठ्ठ व्यक्ती याला लवकर बळी पडतात, असेही डॉ. स्वर्णकार यांनी सांगितले.