जलालखेडा (नागपूर) : शिक्षण घेऊन माेठे हाेण्याच्या महत्त्वाकांक्षेत आर्थिक अडचणी आड आल्या आणि त्यावर मात करणे शक्य झाले नाही. त्यातून नैराश्येने ग्रासले आणि २० वर्षीय विद्यार्थिनीने घरी खाेलीत छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा येथे गुरुवारी (दि. १५) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
संजना संजय सातपुते (२०, रा. जलालखेडा, ता. नरखेड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शिक्षणात हुशार असल्याची माहिती अनेकांनी दिली. तिने गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबीयांसाेबत जेवण केले आणि झाेपी गेली. आई-वडील हाॅलमध्ये तर संजना व तिची धाकटी बहीण बाजूच्या खाेलीत झाेपल्या हाेती.
धाकट्या बहिणीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जाग आली तेव्हा तिला संजना छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे तिने लगेच आरडाओरड करीत आई-वडिलांना जागे केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी संजनाला स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती मृत घाेषित केले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
लावायचे होते कम्पुटर क्लासेस
संजना वरूड (जिल्हा अमरावती) येथील काॅलेजमध्ये शिकायची. सुटीच्या दिवशी ती कामाला जायची. तिला काटाेल येथे काॅम्प्युटरचे क्लासेस करायचे हाेते. आर्थिक अडचणीमुळे तिला काॅम्प्युटरचे क्लासेसला प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे ती हताश झाली हाेती. मला नाेकरी लागू द्या, मी सर्व व्यवस्थित करेन, असे वडिलांना वारंवार सांगणाऱ्या संजनाने निराशेपाेटी तिची संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे जाळली हाेती. आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण व महत्त्वाकांक्षा पूर्ण हाेऊ शकत नाही, असे वाटत असल्याने तिला नैराश्य आले हाेते.