नागपूर : लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसविणाऱ्या व त्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. शरद त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला.
राजेश किसन तागडे (२६) असे आरोपीचे नाव असून तो काटोल येथील रहिवासी आहे. त्याला मुलीचे अपहरण करण्याच्या गुन्ह्याकरिता तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. ती जयताळा येथे राहत होती. ती २९ नोव्हेंबर २०१८ रोजी सीताबर्डीत जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर आरोपीने तिचे अपहरण करून बहिणीच्या घरी नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. मुलगी दोन दिवसानंतर घरी परत आली. तत्पूर्वी ती बेपत्ता असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली होती. त्यामुळे मुलगी परत आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, तिने आपबिती सांगितली. परिणामी, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जीवन भातकुले यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. सोनाली राऊत यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध १० साक्षीदार तपासले. तसेच, यासह अन्य ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील गुन्हे सिद्ध केले.