नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून सततच्या निर्बंधांमुळे लग्नसोहळ्यांवर विरजण पडले होते. त्यातच या सोहळ्यांवर विसंबून असलेला रोजगारही डबघाईस आला होता. कोरोना संक्रमणाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय व लॉन्सचा व्यवसाय पूर्णत: चौपट झाला आहे. थोडी उसंत मिळत नाही तोच संक्रमणाचा वेग वाढत असल्याने आणि नाइलाजाने शासनाला लावावे लागत असलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा व्यवसायावर मरगळ निर्माण होत होती.
अशात संक्रमण ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, लग्नसोहळ्यांना हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगीचे पत्र जारी केले असल्याने मंगल कार्यालये व नियोजित विवाहसोहळे असलेल्या कुटुंबीयांमध्ये उत्साह संचारला आहे.
वधू-वर पित्याची चिंता मिटली
संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० निमंत्रितांच्या उपस्थितीतच विवाह सोहळे आटोपण्याची परवानगी होती. नियम मोडल्यास दंडाची तरतूद होती. त्यामुळे, अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी तशातच आटोपण्याची तयारी सुरू केली होती. आता मात्र शासनाने जारी केलेल्या परवानगीमुळे वर-वधू पित्यांची चिंता मिटली आहे.
मंगल कार्यालयांना दिलासा
विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर विसंबून असणारे दैनिक रोजगार शासनाच्या या निर्णयामुळे पुन्हा सुरू होतील. मंगल कार्यालये, लॉन्स, कॅटरिंग, डेकोरेशन, बॅण्डपथक, मेंदी, डिजे आदींचा रोजगार पुन्हा वाढायला लागेल. आता पुन्हा निर्बंधांची अपेक्षा नाही. शासनाने रोजगाराच्या अनुषंगाने खबरदारी घ्यावी.
- उमाकांत जट्टेवार, कार्याध्यक्ष - नागपूर हॉल ॲण्ड लॉन्स असोसिएशन
शहरातील संख्या
* मंगल कार्यालये - ३००च्या वर
* लॉन्स - १५०च्या वर
फेब्रुवारी-मार्चमधील लग्नाचे मुहूर्त
* शास्त्रानुसारचे उत्तम मुहूर्त
फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७
मार्च - २३, २५, २६, २८, २९
* गुरू-शुक्राच्या अस्तकाळातील मुहूर्त (अस्त दोषाचे)
फेब्रवारी - २०, २१, २२, २३, २४, २५
मार्च - ४, ५, ९, १०, २०