नागपूर : महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे, तसेच कचरा फेकणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. आता पाळीव कुत्रा शौचासाठी रस्त्यांवर आणणाऱ्या श्वान मालकांवर २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. सध्या तंबी देऊन सोडले जात आहे. मात्र, काही दिवसांतच ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मनपाच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे, कचरा फेकणारे, थुंकणा-यांवर तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सात दिवसांत १९८७ लोकांवर कारवाई करून ८ लाख ४० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सोमवारी २९४ लोकांवर कारवाई करून ९३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १९ लोकांवर कारवाई करून ३,८०० रुपयांचा दंड वसूल केला. रस्ता फूटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी, उघड्यावर मलमूत्र विर्सजन करणाऱ्यावर दोन प्रकरणांची नोंद करून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला. ७५ हाथगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांच्याकडून ३० हजार रुपयांची वसुली करण्यात आली, तर कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ६६ लोकांकडून ६,६०० रुपयांची वसुली करण्यात आली.
रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या २२ दुकानदारांकडून ८८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस हॉस्पिटल, पॅथलॅब, चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.