नागपूर : शनिवारी कळमना घाऊक बाजारात १२० रुपये किलो आणि किरकोळमध्ये २०० रुपयांवर पोहोचलेले टोमॅटोचे दर सोमवारी घाऊकमध्ये ६५ ते ७० रुपये आणि किरकोळमध्ये १२० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. आठवड्यात दर कमी होण्याची शक्यता आहे.
कळमना घाऊक बाजारात दररोज १० ट्रकची (एक ट्रक १० टन) आवक होत आहे. एका ट्रकमध्ये जवळपास ६०० क्रेट (एक क्रेट २५ किलो) टोमॅटो असतात. पेरणीच्या हंगामात स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक बंद आहे. टोमॅटो बेंगळुरू, मदनपल्ली, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड येथून विक्रीसाठी येत आहेत. सध्या दर वाढले आहेत. पाऊस वाढल्यानंतर कळमन्यात आठवड्यानंतर दर ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
टोमॅटो मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर सामान्यांना ६० ते ७० रुपयांपर्यंत मिळेल. एक महिन्यानंतर हेच भाव २० ते ३० रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी अविनाश रेवतकर यांनी व्यक्त केली. कोणत्याही मालाची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. ट्रकची आवक वाढल्यानंतर किंमत कमी होईल. काही महिन्यांआधी टोमॅटोची किंमत २ रुपये किलोवर आल्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या टोमॅटो रस्त्यावर फेकल्याची घटना घडली होती.