लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक तालुक्यातील ९ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरापूर्वी वनामृत प्रकल्प वनविभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत २० बचत गटांमधील २०० महिला यात सहभागी झाल्या आहेत. वनउपजातून स्थानिकांना रोजगाराची संधी हा या उपक्रमामागील हेतू आहे.या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रामटेक तालुक्यातील ग्रामस्तरावरील महिला बचत गटांना एकत्र आणून त्यांची सभा घेण्यात आली. यात त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्यात. गावालगतच्या वनक्षेत्रात कोणते गौण वनोपज उपलब्ध होतात याबाबत माहिती संकलित करण्यात आली. संबंधित भागातील बाजारपेठांचा सर्व्हे करून उत्पादनाची मागणी, त्यावर ग्राहकांची प्रतिक्रिया नोंदविण्यात आली. मागणी असलेल्या उत्पादनाचे पॅकिंग, लेबलबाबत माहिती गोळा करण्यात आली. यावरून वनामृत प्रकल्पाचा सूक्ष्मकृती आरखडा तयार करण्यात आला.या वनामृत प्रकल्पाच्या माध्यमातून आवळा ज्यूस, कॅन्डी, मुरब्बा, लोणचे, जॅम, पावडर, बेल ज्यूस, मुरब्बा, चिंच कॅन्डी, जॅम, सॉस यासह अनेक उत्पादन घेतली जात आहेत. तसेच बचत गटातील माहिलांमार्फत कापडी पिशव्या, गांडूळ खत, पापड इत्यादी तयार केले जात आहेत.अंमलबजावणीसाठी करारसंयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प महिला बचत गटामार्फत राबविला जात आहे. संयुक्त वन व्यवस्थापन व महिला बचत गट यांच्यात सामंजस्य करार करण्यात येऊन गौण वनोपजांचे संकलन विनामूल्य करण्याचे ठरले आहे. गौण वनोजपांची उपलब्धता हंगामी असली तरी वर्षभर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महिला बचत गटांना वनमृत अंतर्गत अन्य वनेतर उत्पादनेही तयार केली जात आहे.असे झाले नियोजनसंकलन प्रक्रिया आणि पॅकेजिंगसंबंधी महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले. महिला बचत गटांना साहित्य व मशीनरीचा पुरवठा करण्यात आला. वनधन जनधन शॉपच्या माध्यमातून वनामृत अंतर्गत तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची विक्री करण्यात आली. तसेच महिला बचत गटांना कच्च्या मालाची विक्री व खरेदी संबंधित मूलभूत नोंद ठेवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याने वनविभाग व स्थानिकांमध्ये चांगला संबंध निर्माण होत आहे. वनव्याप्त क्षेत्रातील गावांच्या आर्थिक समस्यांचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी अशा प्रकारचे रोजगार उपलब्ध करणे हाच पर्याय आहे.प्रभूनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक, नागपूर
वनामृत प्रकल्पातून २०० महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 6:51 PM