नागपूर : दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर काही बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी या नोटा घेण्यास नकार दिला, पण हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन आॅईल आणि भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर नोटा स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. खूप दिवसानंतर २ हजाराची दोन नोट बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया पंपावरील डिलिव्हरी बॉयने सदर प्रतिनिधीला दिली.
उमरेड रोडवरील रिलायन्सच्या पंपावर २ हजाराची नोट स्वीकारत नसल्याचा आरोप काही ग्राहकांनी लोकमतशी बोलताना केला. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शनिवारी अनेक पंपावर २ हजाराची नोट स्वीकारणे बंद केले होते, पण रविवारी या सर्वच पंपावर ही नोट स्वीकारत आहे. शनिवारी गुरुदेवनगर, न्यू नंदनवन येथील भारत पेट्रोलियमच्या पंचशील नामक पंपावर २ हजाराची नोट स्वीकारण्याआधी आधार कार्डची झेरॉक्स मागितली. तर याच भागातील श्री गुरुदेव पेट्रोलियम या पंपावर सकाळी २ हजाराची नोट नाकारण्यात आली, मात्र सायंकाळी नोट स्वीकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. डिलिव्हरी बॉयने २ हजाराच्या नोटा दाखविल्या.
सक्करदरा येथील इंडियन आॅईलच्या पंपावर २ हजाराची नोट स्वीकारली जात असल्याचे दिसून आले, तर याच कंपनीच्या वर्धा रोड, पंचशील चौकातील पेट्रोल पंपावर २ हजाराची नोट स्वीकारत नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. तर पुढे काही अंतरावरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर नोट स्वीकारत असल्याचे कर्मचारी म्हणाले.
पेट्रोलियम कंपन्यांनी स्थिती स्पष्ट करावी२ हजाराची नोट चलनात सुरू असतानाही काही पेट्रोलियम कंपन्यांच्या पंपचालकांनी नोटेसंदर्भात संभ्रम निर्माण केला आहे. काहींचा होकार तर काहींचा स्वीकारण्यात नकार आहे. सर्व पंपचालकांनी २ हजाराची नोट स्वीकारावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गजानन पांडे यांनी पेट्रोलियम कंपन्यांकडे केली आहे.