लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी हॉस्पिटलच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने एका वृद्धाचे २० हजार रुपये हडपले. अमरेंद्र नारायण सिंग (वय ६०) हे जरीपटक्यात राहतात. त्यांच्या पत्नीचा उपचार खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. मात्र आराम होत असल्याने त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी केली होती. गुरुवारी दुपारी त्यांना राहुल कुमार नावाच्या एका इसमाचा फोन आला. तुमच्या पत्नीची व्यवस्था जगणाडे चौकातील एका खासगी इस्पितळात करण्यात आली आहे. तुम्हाला आधी ऑनलाइन २० हजार रुपये भरावे लागेल, असे सांगून त्याने एका खात्यात २० हजार रुपये भरण्यास सिंग यांना बाध्य केले.
ही रक्कम भरल्यानंतर सिंग इस्पितळत पोहोचले. तेव्हा हॉस्पिटलच्या नावाखाली त्या भामट्याने बनवाबनवी केल्याचा प्रकार उघड झाला. सिंग यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
कपिलनगरातील एटीएम तोडण्याचे प्रयत्न
कामठी नाक्यावरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरट्याने रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. सुशील रामराव सावरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
युवकाची आत्महत्या
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्माननगर, भिमवाडी येथे राहणारा प्रशिक सुभाष धमगाये (वय १८) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रशिकची आई नीतू सुभाष धमगाये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.