कमल शर्मा
नागपूर : दहा वर्षांनंतर सुरू झालेल्या कोल वॉशरीजबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वीज केंद्रांना निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा आणि महाजेनको आणि राज्य खनिकर्म महामंडळ (एमएसएमसी) यांनी बाळगलेले मौन लक्षात घेता आपसात संगनमत असल्याचे दिसते. या घडामोडीत ४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन करण्यासाठी कोल वॉशरीचा सगळा गोलमाल सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
कोल वाॅशरीबाबत सततच्या तक्रारी आणि आरोपांची लांबलचक मालिका पाहता राज्य सरकारने २०११ मध्ये त्या कायमस्वरूपी बंद केल्या. तथापि, २०१९ मध्ये अचानक कोळसा धुण्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी महाजेनकोऐवजी राज्य खनिकर्म महामंडळाला (एमएसएमसी) नोडल एजन्सी बनवून संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. यातून आपल्या मर्जीतील लोकांना सेट करण्याचा खेळ सुरू झाला.
नागपुरातील अनेकांनी पैसा गुंतवला नेत्यांच्या खास मर्जीतील व्यक्ती चालवत असलेल्या चार कोल वॉशरीजच्या दैनंदिन खर्चासाठी नागपूर शहरातील अनेक फायनान्सर्स पुढे आले आहेत. हा फायनान्सर ७ टक्के व्याजाने पैसे पुरवत आहे. कोल वॉशरीला गेल्या आठ महिन्यांपासून पेमेंट न झाल्याने फायनान्सरची धडधड वाढली आहे.
वाहतुकीची मलई विशेष व्यक्तीला
एमएसएमसीने यासाठी दोन भागांत निविदा प्रक्रिया सुरू केली. ८० टक्के मोठ्या आणि २० टक्के छोट्या कंत्राटदारांना काम देण्यात आले. ८० टक्क्यांअंतर्गत काम हिंद महामिनरल (बिलासपूर) आणि एसीबी इंडिया (नोएडा) यांना देण्यात आले. तर महावीर आणि रुक्माई यांना २० टक्क्यांखाली काम मिळाले आहे.
हिंद महामिनरलला एकूण चार कोळसा वॉशरीज मिळाल्या. दरम्यान, एका बड्या नेत्याने हिंदचे संचालक राजीव आणि संजीव अग्रवाल यांना नागपुरात बोलावून एका खास व्यक्तीची भेट घडवून आणली.
या बैठकीत चंद्रपूरच्या घुग्घुस आणि यवतमाळच्या वणी येथील कोल वॉशरीजचे काम हे विशेष गृहस्थ सांभाळतील, असे पडद्याआड ठरले. १० वर्षांपूर्वी पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करून कोळसा धुण्याचे काम सुरू झाले.
त्या विशेष गृहस्थाला आधीच डिफॉल्टर घोषित केल्यामुळे हिंदच्या नावाने सर्व काम चालू आहे. कोळसा वाहतुकीची मलई विशेष व्यक्तीला मिळत असल्याची चर्चा आहे. यासाठी काही शेल कंपन्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत.