लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या २०२१ या वर्षात चार ग्रहण, ११ उल्कावर्षाव, तीन धूमकेतू, ग्रहांची युती-प्रतियुती आणि सुपर मून, ब्लॅक मून पाहण्याची संधी देशातील खगोल अभ्यासकांना मिळणार आहे. एवढेच नाही तर छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याचीही संधी आहे. परंतु याच वर्षात पृथ्वीच्या जवळून ६ धोकादायक उपग्रह जाणार आहेत. त्यामुळे थोडी दक्षताही घ्यावी लागणार आहे.
या वर्षात चार ग्रहण येतील. त्यापैकी दोन चंद्रग्रहण व दोन सूर्यग्रहण असतील. मात्र भारतामधून दोन छायाकल्प चंद्रग्रहण पाहता येणार आहेत. २६ मे रोजी खग्रास चंद्रग्रहण, दुसरे कंकणाकृती सूर्यग्रहण १० जूनला, तिसरे खंडग्रासचंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला व चौथे खग्रास सूर्यग्रहण ४ डिसेंबरला होणार आहे.
उल्कावर्षाव
२-३ जानेवारी, २२-२३ एप्रिल, ५-७ मे, २८-२९ जुलै, १२-१३ ऑगस्ट, ७-८ व २२-२३ ऑक्टोबर, ४-५, १२ व १७-१८ नोव्हेंबर, १३-१४ व २१-२२ डिसेंबर.
पृथ्वीजवळून जाणारे धोकादायक लघुग्रह
२०१६ डीव्ही-१ हा २०० फूट आकाराचा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक असून, तो २ मार्चला चंद्र आणि पृथ्वीच्या मधून कमीतकमी दीड लाख ते दहा लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे तो धोकादायक श्रेणीत येतो. अपोलो लघुग्रह २००१ एफ ०३२ हा ३१ मार्चला, २५ मे रोजी अपोलो-२०१२ यूव्ही १३६, १ जून रोजी अटेन-२०१८ एलबी, ४ रोजी अपोलो-२०२० एडी १, १३ जुलैला अपोलो एटी ६, १४ ऑगस्टला अपोलो-२०१६ जवळून जाईल.
ग्रहांची युती-प्रतियुती
जानेवारी ते मार्च या काळात बुध ग्रह पाहता येईल. जानेवारी १२ ते १२ बुध-गुरु, शनि-बुध, शुक्र-गुरु युती दिसेल. ५ मार्चला बुध-गुरु. १९ मार्चला मंगळ-चंद्र, 1१९ ऑगस्टला बुध-मंगळ युती. १७ एप्रिलला चंद्र-मंगळ युती, तसेच पिधान दिसेल. १६ मे रोजी मंगळ-चंद्र. २९ मे बुध-शुक्र, १२ जून शुक्र-चंद्र युती. २ ऑगस्टला शनिची प्रतियुती दिसेल. तो पृथ्वीजवळून अधिक तेजस्वी दिसेल. १९ ऑगस्टला गुरुची प्रतियुती दिसेल. ऑक्टोबरला बुध आणि शुक्र पश्चिमेकडे दिसेल. ८ नोव्हेंबरला चंद्र-शुक्राचे पिधान दिसेल.
खगोलशास्त्र आणि खगोलीय घटना विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. त्यांच्या निरीक्षणातून वैज्ञानिक आणि संशोधनात्मक दृष्टी मिळू शकते. कुठलीही अंधश्रद्धा न पाळता या घटना अभ्यासाव्यात.
सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक तथा सदस्य, मराठी विज्ञान परिषद