कुही : पारडी येथील एका महिला शेतकऱ्याच्या शेतात खड्डे खोदून वर्षभरापासून एकाही झाडाची लागवड केली नाही. संपूर्ण शेत वर्षभर पडीक राहिल्याने त्या महिला शेतकऱ्याचे नुकसान झाले. सामाजिक वनीकरण विभागाने फसवणूक केल्याने हे नुकसान कोण भरून देणार अशी विचारणा ग्रामपंचायत पारडीच्या वतीने करण्यात आली आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाने शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीची योजना मंजूर केली. त्यानुसार पारडी येथील महिला शेतकरी शालू हरिराम भगत यांचे शेत सर्व्हे क्र.२६६/३ प. ह. नं.७० आराजी ०.८१ हे.आर मध्ये साग वृक्षलागवडी करिता ३० एप्रिल ६ मे २०२० या कालावधीत शेतात २०२५ खड्डे खोदण्यात आले. वर्ष निघून गेले तरी शेतात वृक्षलागवड करण्यात आली नाही. शेतात खड्डे खोदून ठेवल्याने दुसरे पीक घेता आलेले नाही. त्यामुळे दोन एकर शेत पडीक राहिले. यामुळे २ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची तक्रार या शेतकरी महिलेच्या वतीने पारडी ग्रामपंचायत कार्यालयाकडे करण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायतीने मासिक सभेत शासनाकडून सदर महिलेला शेतीचे नुकसानभरपाई देण्यात यावी. या बाबतचा ठराव ३० मार्च २०२१ रोजी घेतला. महिलेचा तक्रार अर्ज व ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार सामाजिक वनीकरण विभाग, कुही यांना विचारणा केली असता त्यांनी अजूनपर्यंत कुठलेही उत्तर दिलेले नाही. सदर तक्रार अर्जावरून असे दिसून येते की सामाजिक वनीकरण, कुहीने लागवड न केल्यामुळे शासनाची व शेतकऱ्याची दिशाभूल केली. सदर शेतकरी महिला विधवा असून तिला त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी व दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शालू भगत यांच्यासह पारडी ग्रामपंचायतीने सहायक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण यांच्याकडे केली आहे.