लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : निवडणूक आयाेगाच्यावतीने विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम-२०२१ राबविण्यात येत आहे. यात कामठी तालुक्यातील मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती केली जात असून, ज्या मतदारांचा यादीत फाेटाे नाही, अशा २०,३१४ मतदारांची नावे यादीतून बाद केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयाेगाने मतदार यादीत नावासमाेर मतदारांचे फाेटाे अनिवार्य केल्याने त्या अनुषंगाने बीएलओच्या मदतीने सर्वेक्षण करीत माहिती गाेळा करण्यात आली. यात २०,३१४ मतदारांच्या नावासमाेर फाेटो नसल्याचे आढळून आले. अनेक मतदार हे स्थलांतरित असल्याचे मतदार केंद्रस्तरीय अधिकारी, बीएलओ यांच्या निदर्शनास आले आहे. स्थलांतरित मतदाराच्या घरी तीन वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या वेळी जाऊन आले आहेत. अशा स्थलांतरित मतदारांचा ते मतदार यादीवर दिलेल्या पत्त्यांवर आढ़ळून आले नाहीत आणि तेथे राहत नसल्याबाबत बीएलओंनी एकूण ५,९६५ मतदाराचे पंचनामे केले आहे. या पंचनाम्यांच्या याद्या तयार करून त्या सार्वजनिक ठिकाणी, तहसील कार्यालय मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या वेबसाईट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तसेच स्थालांतरित मतदारांच्या नावांची यादी कामठी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे.
संबंधित मतदारांनी स्वत:चे रंगीत छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय कामठी येथे जमा करावे. ३० जूनपर्यंत फोटो जमा न झाल्यास यादीतील मतदार हे स्थलांतरित आहेत, असे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून बाद करण्यात येईल, असेही अरविंद हिंगे यांनी स्पष्ट केले.