नागपूर - सीआरआयएफअंतर्गत (सेंट्रल रोड ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) महाराष्ट्रातील २७२ रस्ते प्रकल्पांसाठी २०८० कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या निधीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक रस्ते प्रकल्पांना वेग मिळण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव(ठाकूर)- ब्राह्मणवाडा मार्गावरील नदीवर पुलासाठी ४ कोटी ९३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याचप्रकारे अमरावती व बडनेरादरम्यान पूल निर्माण करण्यासाठी ४ कोटी ८६ लाख मंजूर करण्यात आले आहेत. याचप्रकारे धनोरा-नंदसावंगी-वाढोणा मार्गाला मजबूत करण्यासाठी १९ कोटी ५५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. चांदूर बाजार-बेलोरा मार्गासाठी १३ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
याचप्रकारे अहमदनगर व औरंगाबाद येथील प्रकल्पांसाठीदेखील निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड व रोपवेसाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तेथे हेलिपॅड व विश्रामगृहदेखील बनविण्यात येतील. हे तीर्थक्षेत्र पुणे-नाशिक तसेच पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या जाईल.