लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये डेंग्यूच्या एकूण ७९४ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यात २०६ रुग्ण एकट्या कुही तालुक्यातील आहेत. तालुक्यात डेंग्यूमुळे आजवर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययाेजना करायला अद्याप जाग आली नाही.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या डेंग्यूच्या रुग्णांनी नाेंद ठेवली जात असल्याने त्यांचे आकडे सहज मिळतात. मात्र, बहुतांश रुग्ण खासगी डाॅक्टरांकडे उपचार घेत असल्याने तसेच खासगी डाॅक्टर आजारनिहाय रुग्णांच्या नाेंदी ठेवत नसल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कळत नाही. वास्तवात, कुही तालुक्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही २०६ पेक्षा अधिक असल्याची माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्याने खासगीत दिली. यात दिवसागणिक वाढ हाेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये नाल्यांची साफसफाई करणे, कचऱ्याची वेळीच याेग्य विल्हेवाट लावणे, डास प्रतिबंधक औषधांची धुरळणी करणे, डासांची पैदास हाेणार नाही याची काळजी घेणे यासह अन्य बाबींकडे अजूनही गांभीर्याने बघितले जात नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून, नागरिक मात्र भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत.
तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्र व कुही येथील ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू, मलेरिया व विषाणूजन्य तापाचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. यातील डेंग्यूच्या रुग्णांवर प्रथमाेपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविले जाते. त्यामुळे तालुक्यात डेंग्यूवर उपचाराची साेय तालुक्यात व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.
...
पचखेडी येथे बालिकेचा मृत्यू
पचखेडी (ता. कुही) येथील आर्या विजय ठवकर या ११ वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे १ ऑगस्ट राेजी नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची पुनरावृत्ती हाेणार नाही, याची प्रशासनासाेबतच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासन गावांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची धुरळणीदेखील करायला तयार नाही. दुसरीकडे, मातोश्री प्रभादेवी सेवा संस्थेच्या वतीने धुरळणी मशीन उपलब्ध करून दिली आहे.