नागपूर : फिरण्यासाठी महागडी कार, त्यातून शहरातील सीसीटीव्हीचा अभ्यास, पोलिसांना लोकेशन कळू नये म्हणून टोळीतील सदस्यांसोबत संपर्कासाठी वॉकीटॉकी, कुलूप तोडण्यासाठी स्वत: तयार केलेली उपकरणे अशा हायटेक पद्धतीने घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने फिल्मीस्टाईलने मुसक्या आवळल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानात कारनामे करणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीकडून कारसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
या टोळीने २१ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. अनुप श्रीगुनारायण सिंग (३६, भोपाळ, मध्यप्रदेश), अभिषेक राजू सिंग (२९, भोपाळ, म.प्र.), अमित ओमप्रकाश सिंग (३४, भोपाळ, म.प्र.) व इम्रान अल्वी ऊर्फ इसाक अल्वी (३४, हापोड, उत्तरप्रदेश) ही आरोपींची नावे आहेत.
या टोळीने २६ जून रोजी नागपुरात चार-पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. घरफोडी पथकाचे एपीआय मयूर चौरसिया हे आठवडाभर शहरातील सीसीटीव्हीचा अभ्यास करत होते. यातून आरोपी कारमध्ये बसून दुसऱ्या राज्यात जात असताना अनेक ठिकाणी नंबर प्लेट बदलल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीच्या कारचा शोध सुरू केला. ही टोळी शनिवारी दुपारी काटोल नाक्यावरून जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांची गाडी थांबवली. पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र चारही बाजूंनी घेरल्याने त्यांना यश आले नाही.
पोलिसांनी काच उघडण्यास सांगितले असता, आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कारची काच फोडून आरोपींना बाहेर काढण्यात आले. या टोळीने नागपुरात १० आणि इतर राज्यात ११ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मयूर चौरसिया, राजेश देशमुख, प्रशांत गभणे, नरेंद्र ठाकूर, रवी अहिर, प्रवीण रोडे, सुधीर पवार यांनी ही कारवाई केली.
अत्याधुनिक यंत्रांच्या आधारे घरफोडी
या टोळीचा म्होरक्या अनुप सिंग आहे. सुमारे सात वर्षांपासून तो ही टोळी चालवत होता. त्याच्यावर अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत. चोरलेल्या कारमधून तो आपल्या साथीदारांसह भोपाळहून निघायचा. त्याला ज्या शहरात चोरी करायची आहे, तेथील पॉश भागात तो दिवसभर फिरायचा आणि बंद घरे व बंगले शोधायचा. या टोळीकडे कुलूप किंवा दरवाजा क्षणात तोडणारी स्वत: तयार केलेली अत्याधुनिक उपकरणे आहेत. अनुप सिंगने स्वत: लेथ मशीनच्या मदतीने ते तयार केले आहेत. एखादे असे घर लक्षात आले की टोळी तेथे काही वेळातच घरफोडी करून व रोख रक्कम, मौल्यवान वस्तू चोरून टोळी फरार व्हायची. एका शहरात ते चार ते पाच घरफोड्या करायचे. टोळीचा म्होरक्या अनुप सिंग मध्यप्रदेशमध्ये दागिने विकायचा. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांत ही टोळी सक्रिय होती.
वॉकीटॉकीचा करायचे वापर
आरोपींचा सुगावा शोधण्यासाठी पोलीस इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची मदत घेतात हे अनुपला माहिती होते. त्यामुळे तो गुन्ह्याच्या ठिकाणी मोबाईल वापरत नव्हता. वॉकीटॉकीच्या माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधायचे. त्यांच्याकडे चार वायरलेस संच आहेत. शहर पोलिसांनी प्रथमच एखाद्या टोळीकडून वॉकीटॉकी जप्त केले आहेत.
गाडीची नंबर प्लेट बदलून प्रवास
पहाटे आणि रात्री पोलिसांची गस्त असते हे माहिती असल्याने ही टोळी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच घरफोड्या करते. टोलनाक्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत अडकू नये म्हणून टोळी गाडीची नंबर प्लेट बदलायची त्यामुळे नंबरच्या आधारे गाडीचा शोध घेणाऱ्या पोलिसांना त्यांना पकडण्यात अपयश यायचे. आरोपीच्या कारमधून ६ नंबर प्लेट आणि ० ते ९ अंकी क्रमांक सापडले आहेत.
अनुप सिंग विदेशी मुलींवर उडवायचा पैसे
अनुप सिंगला विदेशी मुलींचा शौक आहे. चोरीचे पैसे मिळाले की तो दरवेळी दिल्ली-गुडगावला गाठायचा. तिथे रिसॉर्ट किंवा क्लब बुक करून विदेशी मुलींसोबत वेळ घालवायचा. अनेक विदेशी तरुणी त्याच्या नियमित संपर्कात असतात.