अग्निशमन विभागाची तयारी : शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचाही समावेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासह शहरातील २१ रुग्णालयांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी महापालिके च्या अग्निशमन विभागाने केली आहे. या रुग्णालयांची यादी तयार केली आहे. संबंधित रुग्णालयांच्या विरोधात मंगळवारी कारवाई करण्याची सूचना अग्निशमन विभागातर्फे महापालिके च्या जलप्रदाय विभागाला व एसएनडीएलला दिली जाणार आहे. सोबतच सर्वांना नोटीस बजावण्यात येणार आहे. आगीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा नसलेल्या शहरातील ६५ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या सर्वांना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात सुमारे ६०० रुग्णालये व प्रसुती गृह आहेत. यात २४४ मोठ्या रुग्णालयांचा समावेश असून त्यांची लांबी १५ मीटरहून अधिक आहे. त्यामुळे या रुग्णालयांनी अग्निशमन विभागाच्या मानकानुसार सुरक्षा यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. यातील ११७ रुग्णालयांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. यातील १२३ रुग्णालयांनी आग नियंत्रण व नुतनीकरण यंत्रणा उभारलेली आहे. परंतु ५४ रुग्णालयांनी प्रमाणपत्राचे नुतनीकरण केलेले नाही. ६७ रुग्णालयांनी आग नियंत्रणासाठी असलेल्या निकषांची पूर्तता केलेली नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांनी अग्निशमन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्जही केलेला नाही. विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात आग नियंत्रणाबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर अग्निशमन विभागाने शहरातील ९९ रुग्णालयांची तपासणी केली होती. यात अग्निशमन विभागाच्या निकषाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. अशा रुग्णालयातील रग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आग नियंत्रणाची यंत्रणा नसलेल्या ६५ रुग्णालयांना असुरक्षित घोषित करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आगीमुळे कोलकाता येथील अमारी रुग्णालयातील ९० रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील रुग्णालयांतील आग नियत्रंण यंत्रणेकडे अग्निशमन विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वीज व पाणीपुरवठा बंद होणारी रुग्णालये अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रहाटे सर्जिकल (सेंट्रल एव्हेन्यू), प्रेस्टीज रुग्णालय (छावणी), संजीवनी रुग्णालय (लक्ष्मीनगर), अमित सर्जिकल (छत्रपती चौक), जयंत करमाकर (खामला), तांबे रुग्णालय (साई मंदिर जवळ ), जी.एन. चांडक (बजाज नगर), केशव रुग्णालय (मानेवाडा), रेडिसन रुग्णालय (आंबेडकर चौक, सीए), क्योर ईट (सक्करदरा), जे.एन. भाजीपाले (बजाजनगर), प्रफुल्ल गजभिये रुग्णालय (बोरगांव), गिल्लूरकर हॉस्पिटल (सक्करदरा), आरोग्यम (सहकार नगर), रघटाटे रुग्णालय (सीताबर्डी) आदी रग्णालयांचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
२१ रुग्णालयांची वीज व पाणी बंद करणार
By admin | Published: June 25, 2017 2:39 AM